गात्राजवळ रेल्वे इंजिनला आग

0
8

चालक ठरला देवदूत, शेकडोंचे वाचले प्राण

सुरेश येडे
रावणवाडी(गोंदिया)दि.५ : रेल्वे इंजिनमधील जनरेटरच्या वायरमध्ये स्पॉर्किंग झाल्याने इंजिनने पेट घेतला. ही आग हळहळू उग्ररूप धारण करीत असतानाच चालकाने गाडी थांबविली. रेती,मातीचा मारा केला. प्रवाशांनी जीवाच्या आतंकाने डब्यातून उड्या घेतल्या. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना आज, शनिवारी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास गात्रा रेल्वेस्थानकाजवळ घडली.
गोंदिया- बालाघाट – कटंगी (क्रमांक ७८८२१)ही रेल्वे बालाघाटकडे जाण्यासाठी १२ वाजून १० मिनिटाने गोंदिया रेल्वे स्थानकातून सुटली. मध्यंतरी चालक एम. जे. राव यांना इंजिनमध्ये (क्रमांक ०५९०२) आग लागल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता समयसूचकतेने गात्रा रेल्वेस्थानकाजवळ गाडी थांबविली. गाडीतून धुराचे लोळ वाहात होते. आगही हळूहळू रूद्ररूप धारण करीत होती. त्यामुळे चालक राव यांनीच रेती, माती आणि वाळूचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच गोंदियावरून फायर ब्रिगेडच्या चार गाड्या, रावणवाडी व गोंदियाचे रेल्वे पोलिस, रेल्वे बचाव बल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. दुपारी तीन वाजतानंतर ही गाडी पुन्हा प्रवाशांना घेऊन गोंदियाकडे रवाना झाली. चालक राव यांच्या समयसूचकतेने शेकडो प्रवाशांचे प्राण वाचल्याने ते प्रवाशांसाठी देवदूतच ठरले.