गडचिरोली, दि.१२: येथील पोलिसांनी ८ लाखांचे बक्षिस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली असून, पाच लाखांचे बक्षिस असलेल्या दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष अभियान पथकाचे जवान एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-पेठा जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना संजय उर्फ शंकर मंगू आतला(२३) रा.पेठा व रम्मी उर्फ शांताबाई धोबीराम हलामी(२२) रा.कोसमी नं१ ता.धानोरा यांना ४ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. संजय आतला हा जहाल नक्षलवादी असून, कंपनी क्रमांक १० चा सदस्य आहे. डिसेंबर २००९ मध्ये तो कसनसूर दलममध्ये सहभागी झाला. तेथे तो ऑक्टोबर २०१० पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर तो डीव्हीसी जोगन्नाचा सुरक्षारक्षक म्हणून काम करु लागला. सप्टेंबर २०१४ पर्यंत तो जोगन्नाकडेच काम करीत होता. त्यानंतर तो कंपनी क्रमांक १० चा सदस्य झाला. ऑगस्ट २०१५ पर्यंत तो या कंपनीत कार्यरत होता. आशा, हिंदेवाडा,पेठा, नारगुंडा व कोठेनार येथील चकमकी, कोळसेगुडम येथील रवींद्र सुनकरीची हत्या व गट्टा येथील ट्रॅक्टर जाळपोळीत त्याचा सहभाग होता.
दुसरी नक्षली रमी हलामी ही डिसेंबर २०१० मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली. त्यानंतर २०१२ मध्ये कंपनी क्रमांक १० मध्ये तिची बदली झाली. ऑगस्ट २०१५ पर्यंत ती तेथे कार्यरत होती. आशा, फुलकोडो, गुरजा येथील चकमकी व रवींद्र सुनकरीच्या हत्येत तिचा सहभाग होता. संजय व रमी यांच्यावर रेपनपल्ली पोलिस मदत केंद्रात गुन्हे दाखल असल्याने त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर १० सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याशिवाय दोन नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. साईनाथ उर्फ राकेश कटिया पदा(२२) रा.कुंजेमरका ता.एटापल्ली व अरुणा उर्फ रुखमा केहका नरोटे(२२)रा.झारेवाडा ता.एटापल्ली अशी त्यांची नावे आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली.