ही तर ‘अच्छे दिन’ची सुरुवात

0
13

भंडारा ,दि.१२ : तत्कालीन सरकारच्या कारभारामुळे देशातील जनता पिचल्या गेली होती. त्यांना न्याय देण्यासाठी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. परंतु विरोधकांकडून ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडविण्यात येत आहे. केवळ १२ रुपये भरुन विमा काढल्यानंतर एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून दोन लाख रुपयांचा परतावा मिळत असेल तर हे जनसेवा करणार्‍या केंद्र सरकारचे यश होय, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर आमदार रामचंद्र अवसरे, कृषी सभापती नरेश डहारे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, तहसीलदार सुशांत बनसोडे, सरपंच प्रभाकर बोदेले, उपसरपंच जगदीश निंबार्ते, पंचायत समिती सदस्य मनिषा वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य नत्थुजी बांते, रिता सुखदेवे उपस्थित होते.
मानेगाव बाजार येथील रहिवाशी हौसीलाल सिवाराम खंगार यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत वार्षिक १२ रुपये भरुन फेब्रुवारी महिन्यात प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेचा विमा काढला. त्यानंतर प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांचे निधन झाले. सरकारने त्यांना या विम्याचा लाभ देताना दोन लाख रुपयांचा परतावा खंगार कुटुंबांना केला.
यावेळी बोलताना खा.पटोले म्हणाले, केंद्र सरकारच्या योजना शेतकरी, भूमिहीन व सामान्य जनतेसाठी आहेत. तळागाळातील लोक सुखी व्हावेत, यादिशेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक लोकांचे बँकेत खाते उघडून त्यांना अशा योजनांचा लाभ देण्यासाठी जनजागृती करावी. आणि जनतेनेही त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विमा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक डांगोरे यांनी तर आभार प्रदर्शन एकनाथ भुरे यांनी केले. या कार्यक्रमाला पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.