माजी आमदाराच्या हत्येसाठी दिली होती १0 लाखांची सुपारी

0
11

गोंदिया दि.२०: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीचे माजी आमदार व महात्मा फुले समता परिषदेचे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष हरिराम वरखडे यांना ठार करण्यासाठी १0 लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी पाच आरोपींना शनिवारी आरमोरी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील गुरूदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. देवराव जोगी व सुधा जोगी या दाम्पत्यांच्या हत्येप्रकरणाचा तपास गडचांदूरचे पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे करीत असताना खबर्‍याने तुमसर येथील मयूर मल्लेलवार, पिंटू गायधने व दिलीप राजाराम पारधी रा. चौगान ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर यांना संतोष मारोतराव गोंधोळे रा. आरमोरी व प्रभाकर सपाटे रा. आरमोरी यांनी माजी आमदार हरिराम वरखडे यांना जीवे मारण्यासाठी १0 लाख रूपयांची सुपारी दिली होती. या कामासाठी पाच हजार रूपये रोखीने देण्यात आले व वरखडे यांना मारण्याचा कट संतोष गोंधोडे यांच्या आरमोरी येथील निवासस्थानी २४ ऑगस्ट २0१५ रोजी रचण्यात आला, अशी माहिती मिळाली. त्या आधारावर रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे भादंविच्या १२0 (ब), ३0२ अन्वये शून्य क्रमांकाच्या अपराधावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असल्याने मयूर गणेश मल्लेलवार, पिंटू नारायण गायधने रा. दोघेही तुमसर जि. भंडारा व दिलीप राजीराम पारधी यांना आरमोरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच संतोष मारोतराव गोंधोळे व प्रभाकर सपाटे यांच्यावरही आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांनी चौकशी सुरु केली.