देवरांच्या निधनामुळे भाजपसमोर पुन्हा पेच

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई – काँग्रेसचे राज्यसभा सदस्य मुरली देवरा यांच्या निधनामुळे रिक्त होणार्‍या जागेवरून आता पुन्हा एकदा राज्यात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. या रिक्त जागेवर भाजपला आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यांना शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घेण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. त्यामुळे आता नेमकी कुणाची मदत घ्यायची याचा पेच पुन्हा भाजपसमोर उभा राहणार आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला तर विजयासाठी भाजपला मोठे परिश्रम करावे लागू शकतात. पुन्हा एकदा विश्वासदर्शक ठरावासारखे राजकीय युद्धही पाहायला मिळू शकते.तर दुसरीकडे काँग्रेस मुरली देवरा यांच्याठिकाणी त्यांचे चिरंजीव मिलींद देवरा यांना रिंगणात उतरवू शकते.देवरा यांचे सवर्च पक्षातील संबध बघता काँग्रेसला लाभ मिळू शकतो परंतु शिवसेनेची भूमिका महत्वाची राहणार आहे.ही जागा 2020 पयर्ंत आहे.

अलीकडेच भाजपवासी झालेले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पक्षाने हरियाणातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता भाजप महाराष्ट्रात नेमकी कुणाला राज्यसभेची उमेदवारी देऊ शकते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यसभेसाठी विधानसभेतील निर्वाचित आमदारच मतदान करू शकतात. त्यामुळे राज्यातील २८७ आमदारांना मतदानाचा हक्क प्राप्त होईल. यापैकी किमान १४४ आमदारांचे पाठबळ लाभलेली व्यक्ती राज्यसभेवर निवडून जाईल. सध्या भाजप आणि मित्रपक्षांची सदस्य संख्या १२२ असून काही अपक्ष व मनसे आमदार मिळून भाजप सहज १३० चा पल्ला गाठेल. मात्र आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित करायचा असेल तर भाजपला एकतर शिवसेनेची किंवा राष्ट्रवादीची उघड मदत घ्यावी लागेल. शिवसेनेशी भाजपची मैत्री झाली तर या दोघांचे मिळून १८५ आमदार होत असल्याने कदाचित भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून येईल. मात्र शिवसेनेशी मैत्री न झाल्यास भाजपला पुन्हा राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल. अशा स्थितीत शिवसेना रिंगणात उमेदवार उतरवणार का? आणि या उमेदवाराला कोणते पक्ष पाठिंबा देणार? असे अनेक प्रश्न उभे राहू शकतात. भाजपची कोंडी करण्यासाठी काँग्रेसही आपला उमेदवार रिंगणात उतरवू शकते.