आता नागपुरातून चार्टर विमानसेवा;पहिल्या हॉकर-800 विमानाचे थाटात स्वागत

0
165

– केंद्राच्या धोरण बदलामुळे ऐतिहासिक निर्णय
नागपूर, —विदर्भाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे सामर्थ्य असलेल्या मिहान प्रकल्पातील सेझमध्ये असलेल्या एमआरओच्या शिरपेचात आज आणखी एक नवा अध्याय जोडला गेला. एमआरओमध्ये आजवर एअर इंडिया आणि इतर भारतीय विमाने केवळ देखभाल दुरुस्तीसाठी येत असत, पण कुणाला चार्टर विमानसेवेची गरज असल्यास ती मध्यभारतात उपलब्ध नव्हती. एमआरओचा आर्थिक विकास व्हावा व तो स्वबळावर सक्षम रहावा यासाठी केंद्र शासनाने विमानसेवांच्या धोरणात बदल केला आणि त्याचा प्रत्यय म्हणून देशातील पहिली चार्टर विमानसेवा भाडेतत्वावर देणारी कंपनी जेटसेटगोने नागपुरात पदार्पण केले. या आगमनाची सलामी म्हणून कंपनीचे हॉकर-800 एक्सपी हे पहिले छोटेखानी विमान नागपुरात दाखल झाले. प्रचंड उत्साहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत,महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी विमला आर., जेटसेटगोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कनिका टेकरीवाल यांच्यासह मिहान व एमआरओच्या अधिकार्‍यांनी विमानावर पाण्याचा मारा करून हॉकरचे स्वागत केले.
सध्या अहमदाबाद येथील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (गिफ्ट) सिटीमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात जेटसेटगो या कंपनीचे युनिट कार्यरत असून, या कंपनीच्या माध्यमातून भाड्याने देणासाठी उपलब्ध असलेली विमाने आता नागपूरच्या सेझमधील एअर इंडिया एमआरओत स्थायी स्वरुपात राहणार आहेत.

येत्या काळात एमआरओच्या व्यवसायाची गरज लक्षात घेता, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केंद्र शासनाने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने यासंदर्भातील सर्व परवाने आणि दस्तावेज लगेच उपलब्ध करून देण्यात आले. राज्य शासनाकडून आवश्यक असणारी परवानगी देखील केवळ दोन तासात उपलब्ध करून देण्यात आली. यापूर्वी कोणत्याही हवाई कंपनीला भाडेतत्वावर विमान हवे असल्यास विदेशात थेट आयर्लंडला जावे लागत असे. विदेशातील स्थानिक कंपन्यांच्या माध्यमातून चार्टर सेवा उपलब्ध व्हायची, आता या क्षेत्रात जेटसेटगो ही भारतीय कंपनी इतर हवाई कंपन्यांना विमाने भाड्याने देऊ शकेल.

आज नागपुरात पोहोचलेले विमान सातआसनी असून ते एमआरओमध्ये स्थायी स्वरूपात उपलब्ध राहील. या कार्यक्रमाला विकास आयुक्त व्ही. श्रमण, एमआरओचे महाप्रबंधक सत्यशील, एअर इंडियाचे सी. बी. कारखानीस, सुनील अरोरा, अक्षत अग्रवाल, अभिषेक कुमार, पंकज राय, मुख्य जीएसटी आयुक्त अशोककुमार, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सहा महिन्यात दहा विमाने
यासंदर्भात बोलताना कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कनिका टेकरीवाल यांनी, ‘गिफ्ट सिटीमध्ये विमानतळ नसल्यामुळे मध्य भारतात केवळ नागपूर व हैदराबाद या दोनच शहरात सेझ असल्यामुळे मध्य भारताची त्यातही नागपूरची निवड करण्यात आल्याचे सांगितले. मिहानने या प्रस्तावाला दोन दिवसात मंजुरी दिली. सध्या सहा विमाने भाडेतत्वावर देण्याचे निश्चित झाले असून, येत्या सहा महिन्यांत अजून दहा विमाने भाडेतत्वाने देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
विकासाला चालना मिळणार
केंद्र व राज्य शासनाने संयुक्तरित्या गतीशील निर्णय घेतल्यामुळे नागपुरात ही सुविधा उपलब्ध झाली. या नव्या निर्णयामुळे मिहानच्या विकासाला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती देखील होईल, असे मत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
तीन तासांचा विलंब
हॉकर-800 हे विमान कार्यक्रमापूर्वीच नागपूर विमानतळावर उभे होते, पण शिवणगावातील टॅक्सी-वे मधून हे विमान टो करून एमआरओमध्ये आणावे लागते. स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात कल्पना नसावी, असे दिसून आले. कारण, टोईंग व्हॅनने खेचून विमान एमआरओमध्ये आणण्यासाठी तब्बल तीन तासांचा विलंब लागला.