मनरो शाळेला ‘हेरिटेज’चा दर्जा द्या

0
39

भंडारा-भंडारा शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) सभोवताल होऊ घातलेल्या गाळे बांधकामाला विद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला असून या शाळेला हेरिटेजचा दर्जा दिला जावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा लढा सुरू झाला आहे.
लाल बहादूर शास्त्री मनरो विद्यालय शिट नं.११ येथील आवारभिंतीला लागून असलेली जागा विकसीत करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव घेतला होता. त्यानंतर या निर्णयाला शासनाने मंजूरी दिली. परंतु, लाल बहादूर शास्त्री शाळा ऐतिहासीक आहे. इमारतीचे बांधकाम उत्कृष्ट आहे. या शाळेत असलेली मोकळी जागा या शाळेला आल्हाददायक रूप देते. उन्हाळ्यातही खोल्यांचे तापमान नियंत्रित असते. शाळेच्या इमारतीच्या भिंती विशिष्ट विटांपासून बनवल्या आहेत आणि विशिष्ट मिर्शणाच्या पेस्टने एकत्र चिकटल्या आहेत. कलाकुसरही उत्कृष्ठ आहे. या शाळेने देशाचा स्वातंत्र्यलढा अनुभवला आहे आणि अनेक स्वातंत्र्य सैनिक पाहिले आहेत.
या शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रचंड चढाओढ असते. शाळेत शिक्षण घेतलेले ५0 हजारहून अधिक माजी विद्यार्थी विविध पदांवर देशात आणि परदेशात कार्यरत आहेत. त्यांच्या भावना या शाळेशी जोडलेल्या आहेत. अशा ऐतिहासीक वास्तुच्या सभोवतालचा परिसर विकसीत करण्याच्या नावावर बिल्डरांच्या घशात दिला जात असल्याने आजी माजी विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
दुकानांचे गाळे उभारुन जिल्हा परिषदेला आर्थिक लाभ पोहोचविण्यासाठी गाळे बांधकामाचा ठराव घेण्यात आला असला तरी ऐतिहासिक भूखंडच बिल्डरांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा षडयंत्र रचला जात आहे. भविष्यात सदर भुखंडावर अनु™ोय असलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकात वाढ झाल्यास अतिरिक्त भुखंडसुद्धा बिल्डर आपल्या ताब्यात घेऊ शकतात. त्यामुळे या शाळेच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचे काम सुरू झाले आहे.
तेव्हा या ऐतिहासिक वास्तूचे जतन होणे गरजेचे असल्याने या वास्तुला हेरिटेजचा दर्जा दिला जावा, यासाठी आजी माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.