ईडीने खासदार भावना गवळींच्या 5 संस्थांवर टाकले छापे, किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर मोठी कारवाई

0
85

वाशिम/यवतमाळ,दि.30ः- अंमलबजावणी संचालनालयाने यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी यांना मोठा धक्का दिला आहे. ईडीने गवळी यांच्या वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील 5 संस्थांवर छापेमारी केली आहे. छापेमारीदरम्यान, ईडी संबंधित संस्थांनाच्या कागदपत्राची चौकशी करीत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

दरम्यान, सोमय्या यांनी अंमलबजावणी संचालनालयात याबाबत तक्रारदेखील दाखल केली होती. या तक्रारीनुसार, ईडीने भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर छापे टाकले आहे. त्यामुळे चौकशीतून काय समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे भावना गवळी या यवतमाळ-वाशिम मतदार संघातून 5 वेळा निवडून गेल्या आहेत.

प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या हे काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दौऱ्यादरम्यान, त्यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. सोमय्या यांनी ईडीकडे याबाबत तशी तक्रार दाखल करत चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीनुसार, ईडीचे वेगवेगळे पथक यवतमाळ-वाशिम जिल्ह्यात दाखल झाले असून संबंधित संस्थांनाची चौकशी करीत आहे. दौऱ्यादरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर दगडफेक आणि शाहीफेक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले होते.