राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्र्याना निवेदन सादर

0
18

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज रविवारली विधिमंडळ पक्षनेते आ.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दुष्काळी परिस्थितीसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे , माजी मंत्री छगन भुजबळ, विधिमंडळ उपनेते आ.जयदत्त क्षीरसागर,माजी विधानसभा अध्यक्ष आ.दिलीप वळसे पाटील,माजी आ.मंत्री जयंत पाटील, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आ.धनंजय मुंडे, आ.राणा जगजितसिंह पाटील,आ.राहूल मोटे, आ.विक्रम काळे, आ.विजय भाबंळे,आ.रामराव वडकुते आदिंचा समावेश होता.यावेळी पत्रकारांशी बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ.अजितदादा पवार म्हणाले की सध्या राज्यातील मराठवाड्या सारख्या विभागात भीषण दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे. यावर सरकारने तातडीने उपाय योजना करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. आम्ही निवेदनाव्दांरे सरकारकडे मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या विभागातील सर्व शेतकऱ्यांचे १०० टक्के पीक कर्ज माफ करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे वीजेचे बील माफ करावे,शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी ५० हजार रुपये हेक्टरी इतकी मदत जाहीर करावी या प्रुमख मागण्यांसह कापसाला ६५०० रुपये इतका हमी भाव द्यावा, कापूस खरेदी साठी १५० नवीन केंद्रे सुरु करावीत, दुध उत्पादक, ऊस उत्पादक व साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणी दूर कराव्यात, तसेच दलित, मागासवर्गीयांवरील अत्याचार रोखले जावेत , जवखेडा दलित अत्याचार प्रकरणाचा पोलिस यंत्रणेमार्फत अधिक गतीने तपास करुन संबधीत आरोपींना जेरबंद करावे व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशा प्रकारच्या विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाव्दारे सरकारकडे सादर केल्या आहेत. या विविध मागण्यांवर सरकार लवकरच गंभीरपणे
निर्णय घेईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे आ.अजितदादा पवार यांनी सांगितले आहे.