उदगीरमध्ये साहित्यिकांचा मेळावा:शरद पवारांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

0
19

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आजपासून उदगीरमध्ये सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते संमलेनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यापुर्वी सकाळीच ग्रंथदिंडीने साहित्य रसिकांचे उदगीरनगरीत स्वागत करण्यात आले. लहान मुले पारंपारिक वेशभूषेत ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. फेटे घालून महिलांचीदेखील बाईक रॅली काढण्यात आली.

ग्रंथदिंडीत मुलींनी पारंपारिक नृत्य सादर केले.
ग्रंथदिंडीत मुलींनी पारंपारिक नृत्य सादर केले.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबईत ज्याप्रमाणे मराठी भाषा भवनाची निर्मिती करण्यात येत आहे, त्याचप्रकारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा भवन निर्माण करणार. यासाठी मुख्यमंत्री आग्रही असून लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी प्रस्ताव सादर करून याबाबत मंजुरी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भाषा भवनाच्या माध्यमातून मराठीचे संवर्धन!
प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज असे मराठी भाषा भवन उभारले जाईल. सर्व विषयावरील नवी तसेच जुनी मराठी पुस्तके, दालने, संग्रहालय याने ही भवने समृद्ध असतील. सर्वांना या भाषा भवनाचा वापर करून आपली मराठी समृद्ध करता येईल. मराठी भाषेच्या अभ्यासकांना तसेच सामान्यांनाही अशा भवनांमुळे फायदा होईल. यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध तसेच मराठी भाषेचा प्रचारही होईल, असे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या 10 वर्षांपासून राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यास अद्याप यश आलेले नाही, अशी खंतही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, मराठी भाषेला 5 हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे लवकरच केंद्र सरकारडून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

संमेलनात 162 पुस्तकांचे होणार प्रकाशन
उदगीरमध्ये होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनात प्रथमच नवलेखकांच्या 162 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नवोदित लेखकांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे, ही अपेक्षा आहे. पुस्तक प्रकाशनाचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसून विशेषतः ग्रामीण भागातील लेखकांचे साहित्य यामुळे अप्रकाशित राहाते. हीच बाब लक्षात घेता या व्यासपीठावरून १०० रुपये नाममात्र शुल्क आकारून लेखकांच्या साहित्याला प्रकाशझोतात आणण्याची संधी देण्यात आली आहे. याचा लाभ घेत महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश आदी ठिकाणच्या लेखकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.