यंदा मान्सून 10 दिवस आधी:20 ते 21 मे दरम्यान अंदमानमध्ये, 30 मे पर्यंत केरळ तर 11 जून पर्यंत मुंबईत

0
66

नवी दिल्ली- विक्रम उन्हाळ्यानंतर आता मान्सून लवकर दाखल होण्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे भर उन्हामध्ये आनंदाचा थंडावा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वात आधी मान्सून अंदमान मध्ये दाखल होतो, त्यानुसार आगामी 20 ते 21 मे दरम्यान मान्सून अंदमान मध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अंदमान नंतर भारतात सर्वात आधी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. सदरील अंदाजानुसार सर्व काही व्यवस्थित राहिले तर 28 ते 30 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे त्यानंतर 7 दिवसांनी मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. म्हणजेच तळकोकणात मान्सून 7 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. तर 11 जून पर्यंत मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो.

मान्सून लवकर दाखल होण्याची कारणे

बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या वातावरणीय बदलांमुळे मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासंदर्भात ‘युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर’ या संस्थेच्या वतीने आपला अंदाज जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी देखील मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला होता. यंदा देखील अडचण आली नाही तर, मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा

महाराष्ट्रात तळकोकणात सर्वात आधी मान्सून दाखल होतो. संबंधित संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सर्व व्यवस्थित राहिले तर मान्सून 7 जून पर्यंत तळकोकणात तर 11 जून पर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून लवकर दाखल झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सामान्य पाऊस पडला तरी शेतकऱ्यांना फायदा होईल.

भारतात मान्सूनची वाटचाल कशी

भारतामध्ये शेती आधारीत उद्योग मान्सूनवर अवलंबून आहेत. भारतातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी जवळपास 40 टक्के पेरणी क्षेत्र हे पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. भारतीय हवामान विभागाने अद्याप भारतातील मान्सूनची वाटचाल जाहीर केली नसली तरी यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्‍यता पाहता लवकरच या बंधीचा अंदाज व्यक्त होण्याची अपेक्षा आहे.