आरटीओ चेकपोस्ट ठरतोय भ्रष्टाचाराचा अड्डा-बंटी शेळकेचा आरोप

0
36

देवरी- देवरीचे आर. टी. ओ. चेक पोस्ट अवैध वसुलीचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या चेक पोस्ट वर कर्तव्यावर असलेल्या अधिकार्‍यांच्या एजेंटद्वारे ट्रक, वाहन चालकांकडून अवैध वसुली करून त्यांच्या आर्थिक शोषण केला जात आहे. अशा अनेक बातम्या माध्यमांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु, त्यावर आळा बसेल, अशा उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे नागपूर येथील महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी आपल्या सर्मथकांसह देवरी चेक पोस्टवर सुरू असलेल्या अवैध वसुलीला घेऊन शनिवार, २८ मेपासून आंदोलन पुकारले आहे. कार्यरत भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील देवरी येथील आरटीओ चेकपोस्टातून दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा असते. याचाच फायदा घेत काही अधिकार्‍यांनी आपले एजेंट नेमले आहेत. त्या एजंटांकडून वाहनधारकांची लूट सुरू आहे. अवैध वसुली करून ते अधिकार्‍यांचे खिशे गरम करीत आहेत. यासंदर्भात अनेकदा लक्ष वेधण्यात आले. परंतु, अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार नितनियमाप्रमाणे सुरूच आहे. याविरोधात नागपूर येथील महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भारतीय राष्ट्रीय युवक कांग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी आपल्या सर्मथकांसह एल्गार पुकारला आहे. दरम्यान ट्रक चालक-मालकांच्या आर्थिक शोषण थांबवावा, आर.टी.ओ. दलाल मुक्त करा, गुंडागर्दी करून अवैध वसुली थांबवा, भ्रष्ट अधिकार्‍यांना निलंबित करावे, कोट्यवधींचा राजस्व महसूल चोरी थांबवावी आणि शासनाने संबंधित अधिकार्‍याच्या संपत्तीची तपासणी करून ईडीद्वारे धाड टाकून कारवाई करावी आदी मागण्या केल्या आहेत. जोपर्यंत कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात भंडारा जिल्हा युवक कांग्रेस उपाध्यक्ष सोनु बैरागी, भंडारा विस युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश ठवकर, उपाध्यक्ष आनंद चिंचखेडे सह विदर्भ व छत्तीसगढ. युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्तागण उपस्थित आहेत.

आंदोलनामध्ये पोलिस प्रशासनाद्वारा असहकार्य आणि नकारात्मक भूमिका असल्याचे आरोप लावले आहे. आरटीओ चेक पोस्टवरील गुंडागर्दी थांबविण्यासाठी राजस्व बुडविणार्‍यावर कारवाईच्या आंदोलनासाठी पोलिस प्रशासनाकडून सहकार्य मिळाला नाही.
-बंटी शेळके