30 भाविकांसह बस दरीत कोसळली:मध्य प्रदेशातून चारधाम यात्रेला जात होते भाविक, 22 ठार

0
28

उत्तराखंडच्या उत्तरकाशीत मध्य प्रदेशाच्या 30 भाविकांची एक बस दरीत कोसळली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून, 6 जण गंभीर जखमी झालेत. सर्व मृतांचे मृतदेह हाती लागलेत. पोलिस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. SDRF चे पथकही घटनास्थळी मदत कार्य करत आहे.

पंतप्रधान कार्यालयानेही एका ट्विटद्वारे मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.

डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, ‘सर्वच प्रवाशी मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्याचे आहेत. अपघतानंतर रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.’

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एनडीआरएफचे पथक लवकरच बचाव मोहिमेची सूत्रे सांभाळणार असल्याचे सांगितले आहे. ‘हे पथक लवकरच घटनास्थळी पोहोचेल,’ असे ते म्हणाले.

अमित शहांनी व्यक्त केले दुःख

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले -‘भाविकांची बस दरीत कोसळली. माझी या प्रकरणी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा झाली आहे. घटनास्थळी बचाव व मदतकार्य सुरू आहे.’

शिवराज यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका ट्विटद्वारे आपली या प्रकरणी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे स्पष्ट केले आहे. ‘उत्तराखंडच्या चारधाम यात्रेंतर्गत यमुनोत्रीला जाणारी बस दरीत कोसळल्यामुळे मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुखद व वेदनादायी घटना आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.’

शिवराज अन्य एका ट्विटमध्ये म्हणाले -‘सरकारचे अधिकारी उत्तराखंड सरकार व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. जखमींना उपचार व मृतांचे पार्थिव आणण्याची व्यवस्था केली जात आहे. दुःखाच्या या प्रसंगात पीडितांनी स्वतःला एकटे समजू नये. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत.’