राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा:18 जुलै रोजी मतदान, गरज भासली तर 21 जुलै रोजी होणार मतमोजणी

0
35

नवी दिल्ली,दि.09ः निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार, उमेदवारांना 29 जूनपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर 18 जुलै रोजी निवडणूक होईल. गरज भासल्यास 21 जुलै रोजी निकालाची घोषणा केली जाईल. आयोगाने या निवडणुकीतील सर्वच प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. ते 2017 मध्ये या पदावर विराजमान झाले होते. कोविंद देशाचे 15 वे राष्ट्रपती आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएची स्थिती गतवेळसारखीच मजबूत आहे. पण, यावेळी त्यांनी आंध्र प्रदेश व ओडिशाकडून समर्थन मागितले आहे. यूपीएची नजर राज्यसभेच्या 16 जागांवर आहे. या जागांवर येत्या 10 तारखेला निवडणूक होणार आहे.

यामुळे मजबूत आहे एनडीए

एनडीएला बहुमताचा जादुई आकडा गाठणे फार अवघड नाही. त्यांना बीजेडीचे नवीन पटनायक व वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींच्या पाठिंब्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही नेत्यांशी चर्चाही केली आहे. पण, दोघांनीही उमेदवाराचे नाव पाहून निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतीपदाच्या मागील निवडणुकीत एनडीची कामगिरी खूप चांगली झाली. रामनाथ कोविंद यांना 65.35 टक्के मतदान मिळाले होते. एनडीए यावेळीही त्याची पुनरावृत्ती करण्याच्या विचारात आहे.

राज्यसभा निवडणुकीमुळे पेच फसला

राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेत राज्यसभेचे सदस्य सहभागी होतात. त्यामुळे 10 जून रोजी राज्यसभेच्या 57 जागांपैकी 16 जागांवर होणाऱ्या निवडणुकीवर सर्वांची नजर आहे. 57 पैकी 41 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. उर्वरित 16 जागांवर महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक व हरियाणात निवडणूक होणार आहे. या जागा कुणाच्या ताब्यात जातील हे सांगणे सध्या अवघड आहे.