मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही करोनाची लागण

0
38

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही करोनाची लागण झाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ आणि नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमचा एकही आमदार फुटला नसल्याचं यावेळी कमलनाथ यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह असून फोनवरुन त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली.“काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला ४४ पैकी ४१ आमदार उपस्थित होते. तीन आमदार प्रवासात आहेत. काँग्रेस पक्षात एकता आहे,” असं कमलनाथ यांनी सांगितलं.

शरद पवार गृहखात्यावर नाराज

एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचे कसे कळाले नाही, असा सवाल करत मविआ निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहखात्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर आज सिलव्हर ओकवर बैठक पार पडली. या बैठकीत जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या हालचालींची राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला कल्पना आली नाही, मंत्र्यांना पोलिसांची सुरक्षा असते, गुजरातच्या सीमेपर्यंत पोलिस त्यांच्यासोबत होते. तरीही मंत्री, आमदारांच्या हालचालींची माहिती गृहखात्याला कशी मिळाली नाही, हे सवाल बैठकीत उपस्थित झाले तर राजकीय परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.