छगन भुजबळांच्या मालमत्तेवर छापे

0
9

वृत्तसंस्था

मुंबई, दि. १ – महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाकडून पुन्हा छापे मारण्यात आले आहेत.
छगन भुजबळ लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसतील अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या छाप्यांवर दिली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारण्यात आल्याचे वृत्त आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या वरीष्ठ अधिका-यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, एक डझनपेक्षा जास्त अधिका-यांची टीम छाप्यांमध्ये सहभागी आहे. तसेच भुजबळांच्या फक्त मुंबईतल्याच मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत तपास संपवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती. याआधी छगन भुजबळ यांनी आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप करत कायद्याच्या मार्गाने आपण लढू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.