बच्चू कडू माझ्या एका कॉलवर गुवाहटीला गेले:फडणवीसांची कबुली; सरकार पाडापाडीत भाजपचा हात असल्याचे पहिल्यांदाच समोर

0
41

मुंबई -बच्चू कडूंनी सौदा केला म्हणणे चुकीचे आहे. बाकी इतरांचे मी म्हणत नाही. मात्र, बच्चू कडू माझ्या एका कॉलवर गुवाहटीला गेले, अशी जाहीर कबुली सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे महाविकास सरकारच्या पाडापाडीमागे भाजप असल्याचे पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आले आहे.मुख्यमंत्री शिंदेवर सर्वांचा भरोसा म्हणून सर्व जण सोबत गेले, असेही यावेळी फडणवीस म्हणाले. सत्ता गेल्याने ‘मविआ’वर परिणाम झाल्याचेही ते म्हणाले.

फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन प्रकल्प जाणे हे केवळ महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. याचे खापर आमच्या माथी फोडू नका, असे उत्तर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सोबतच येणाऱ्या काळात महाराष्ट्रात रिफायनरी होणार असून, त्यातून 1 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा त्यांनी केला.महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून नेले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्याला फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.

काय म्हणाले फडणवीस?

आमदार बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले होते. त्यांना मी सांगितले की, आम्हाला सरकार बनवायचे आहे. तुम्ही सोबत हवे आहात आणि ते गुवाहटीला गेले. बच्चू कडू यांनी कुणाशी सौदा केला, काही उलट सुलट केले हे म्हणणे चुकीचे आहे. बाकी इतरांचे मी म्हणत नाही. बाकीच्या आमदारांचे मला माहित नाही. मी केवळ कडूंना फोन करून सांगितले म्हणजे बाकीच्या आमदारांनी सौदेबाजी केली असे म्हणत नाही, पण माझ्या फोनवर कुणी गेले नाहीत. माझ्या कॉलवर गेलेले केवळ एकटे बच्चू कडू आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

राणा-कडूचा विषय संपलेला

फडणवीस म्हणाले, माझी ही पक्की माहिती आहे की, जे लोक गुवाहटीला गेले ते पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेऊन गुवाहटीला गेले. कारण त्यांना माहिती होते जरा आपल्याकडे लागणारी संख्या नसेल, तर आपले पद देखील जाऊ शकते. तरीही सर्वांचा विश्वास शिंदेंवर होता. यामुळे आम्ही रवी राणा आणि बच्चू कडू यांना समजून सांगितले. यावर बोलताना दोघांनी हे सर्व रागारागातून स्टेटमेंट झाले असे सांगितले आहे. दोघांनी हे स्टेटमेंट रागाच्या भरात झाल्याचे सांगितल्याने आमच्याकडून हा विषय संपलेला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.