अजितदादांची आजपासून चौकशी

0
14

पुणे-महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या तोट्याला जबाबदार धरण्यात आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह ६५ संचालकांची चौकशी आज, शुक्रवारपासून सुरू होत आहे. या चौकशीमध्ये संचालकांवरील आरोप निश्चित करून त्यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर ही पहिलीच सुनावणी होत असल्याने अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इमारतीमधील चौकशी अधिकारी शिवाजीराव पहिनकर यांच्या कार्यालयात ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी बँकेचे तत्कालिन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, यशवंतराव गडाख, नितीन पाटील, अमरसिंह पंडित, राजवर्धन कदमबांडे, विजय वडेट्टीवार, ईश्वरचंद जैन, दिलीपराव देशमुख, जे. एन. पाटील, रामप्रसाद बोर्डीकर, माणिकराव कोकाटे, सुरेश देशमुख, पांडुरंग फुंडकर, विलासराव जगताप, रजनी पाटील, आनंदराव आडसूळ, दिलीप सोपल अशा बड्या नेत्यांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.