मुंबईत पुन्हा हल्ल्याचा इशारा

0
7
मुंबई – मुंबईवर पुन्हा सागरीमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत महाराष्ट्र पोलिसांना माहिती दिली आहे. परिणामी, शहरातील सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
शिवरात्रीच्या दिवशी लष्करे तय्यबाचे दहशतवादी गुजरातमधील मंदिरामध्ये घातपाती कृत्य करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने गुजरात पोलिसांना दिली होती. त्यानंतर राज्यातही दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. असे असताना पुन्हा एकदा दहशतवादी हे मुंबई आणि दिल्ली येथे घातपाती कारवाया करणार असल्याच्या सूचना केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने महाराष्ट्र पोलिसांना दिल्या आहेत. 
 
एका देशातील नागरिक असलेल्या 7-8 जणांनी इसिसमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर दहशतवादी कारवाया करण्यासाठी सागरीमार्गे मुंबईत येणार आहेत. दिल्लीही त्यांच्या “टार्गेट‘वर आहे. हल्ला आणि ठिकाण याबाबत गुप्तचर यंत्रणेने पोलिसांना अधिक माहिती दिलेली नाही. पण काही ठिकाणी सुरक्षेत वाढ करावी, अशा सूचना दिल्या आहेत. 
 
मुंबईत येणाऱ्या बोटींची तपासणी केली जात आहे. तटरक्षक आणि नौदल यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच विमानतळावरही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. “26/11‘ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सागरी सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता.