जालना | आंतरवाली सराटी उपोषणस्थळावर झालेल्या दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत काहींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांसह अनेक आंदोलकर्त्यांनाही मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.मराठा आरक्षणसाठी आंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी बेछूट आणि अमानुष लाठीमार केला. लाठीमार सुरू होताच उपोषणस्थळी एकच गाेंधळ उडाला. चेंगराचेंगरीत लहान मुले, महिलांसह २० आंदोलक जखमी झाले. संतप्त जमावाने १५ बसेसची जाळपोळ केली. ३७ पोलिसही जखमी झाले.
२९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. त्याची दखल न घेतल्याने मनोज जरांडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ७ जणांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. शुक्रवारी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याचे कारण देत प्रशासनाने जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले. जरांगे यांनी दवाखान्यात दाखल होण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला.
अंबड तालुक्यातील सराटी आंतरवाली येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी गावात पोलिसांनी लाठीमार केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने गेवराई-शेवगाव मार्ग पोलिसांनी बंद केला. छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने शेवगाव मार्गाने वळवण्यात आली.
गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासह गेवराई पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम बोडखे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश खरात, पोलिस शिपाई राजू काळे, पोलिस दिनकर मुंडे, गुलाब बरडे आदी पोलिस अधिकारी गेवराई-शेवगाव मार्गावर लक्ष ठेऊन आहेत. तालुक्यातील बागपिंपळगाव तलवाडा फाट्यावर टायर जाळून वाहनावर दगडफेक करण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल होत वातावरणात सुरळीत झाले आहे.दरम्यान, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई तालुक्यातील उमापुर फाटा-शेवगाव रस्ता व राक्षसभुवन फाटा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी रुग्णवाहिका वगळता इतर सर्व वाहतूक बंद करण्यात आली. याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेवराई, संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस डेपोत ठेवल्या असून सोडलेल्या नाहीत.
तात्पुरत्या बंद केलेल्या आहेत. रस्ता सुरळीत होईल तेव्हा सोडण्यात येतील, असे बीडचे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी सांगितले. दरम्यान, जालना जिल्ह्यात जालना ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर चार बसेस फोडल्या. एकूण १५ बसेसचे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यातील एकाही आगारातून बसेस बाहेर काढल्या जाणार नसल्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला असल्याचे जालना एसटी विभाग नियंत्रक प्रमोद नेव्हुल यांनी सांगीतले.
तीन एसपी तळ ठोकून
जालना | जालन्यात लाठीचार्जनंतर जाळपोळीच्या घटना वाढल्यामुळे आयजी ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्ह्याचे एसपी ही जालना जिल्ह्यात तळ ठोकून होते. तर सायंकाळी सात वाजेनंतर जालना शहरातील वातावरणही चांगलेच तापल्याने मुख्य चौकातील दुकाने तसेच मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यात आली होती. रात्री ९.३० वाजता बाजारपेठेत शांतता पहायला मिळाली.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री : लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे.
देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री : जालन्यातील घटना खरोखर दुर्दैवी आणि गंभीर आहे. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयाशी संबंधित विषय आहे. तो एका दिवसात सुटणार नाही.
शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष : राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दलची जी भावना आहे ती पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. पोलिसांना वरून आदेश आले. ते त्यांनी केले.
एसपी : मनोज जरांगे पाटील व त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्यांची तब्येत खालावत होती, असा डाॅक्टरांचा रिपोर्ट होता. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत हे सांगण्यासाठी पोलिस तेथे गेले होते.
पोलिसांनी लाठीमार सुरू केला असा आंदोलकांचा आरोप आहे…
एसपी : पोलिसांवर अचानक दगडफेक सुरू झाली त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलिसांनी अगोदर लाठीमार केलाच नाही.
जरांगे पाटील यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला कुणी दिले?
एसपी : पोलिस त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले नव्हते. त्यांनी उपचार घ्यावेत हे सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो. परवाही जिल्हाधिकारी आणि मी त्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले होते.
लाठीमाराची चौकशी करणार काय?
एसपी : आंतरवाली सराटीतील आंदोलक व ग्रामस्थांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली, त्यात अनेक पोलिस व अधिकारी जखमी झाले, त्याचे काय? लाठीमाराची चौकशी पोिलस करणार नाहीत, दगडफेक करणाऱ्यांवर मात्र गुन्हे दाखल करणार आहोत. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
- जरांगे पाटील यांच्यासह सात आंदोलकांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी प्रचंड पोलिस फौजफाटा गेला नसता तर आंदोलक संतप्त झाले नसते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
- धाराशिव जिल्हा बंदची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ९ वाजता निषेध नोंदवण्यात येणार आहे.
- जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ २ सप्टेंबर रोजी सकाळी १० रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून भुसार मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे.
- बीड : मराठा समाजातर्फे आज जिल्हा बंद