ठाकरे गटाची चाल यशस्वी?विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द

0
13

मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नियोजित परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. घाना या देशात पार पडणाऱ्या 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस लावणार राहुल नार्वेकर हजेरी लावणार होते.पण आता अचानक हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलंय. हा दौरा रद्द होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अफिडेव्हिटनंतर नार्वेकरांनी हा दौरा रद्द केल्याची चर्चा आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या काळात आफ्रिकेतील घाना या देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. पण याच दरम्यान, म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेसंबंधित सुनावणी होणार होती.

आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल नार्वकरांच्या भूमिकेवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर आता राहुल नार्वेकरांनी आपला परदेश दौरा रद्द केला की काय अशी चर्चा सुरू आहे.

नार्वेकरांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून ॲफिडेव्हिट

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या संबंधित वेळापत्रक सादर करावं असंही सांगितलं होतं. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर केलं. पण त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. तसेच राहुल नार्वेकरांच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अॅफिडेव्हिट सादर केलं आहे.

आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा जाहीर झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. एकीकडे आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू असताना दुसरीकडे राहुल नार्वेकर हे राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत, परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे घटनाबाह्य, असंवैधानिक सरकार आहे आणि ज्याला बेकायदेशीर मार्गांनी संरक्षणही दिलं जातंय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता.