मनोज जरांगेंची प्रकृती खालावली;हात थरथरले, आवाज झाला क्षीण;तरीही मागणीवर ठाम

0
3
वाढदिवसाच्या शुभेच्छा

जालना:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांचा हात थरथरत होता. माईकही हातातून खाली पडला. मात्र क्षीण झालेल्या आवाजातही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका मांडली.

दरम्यान त्यांनी मराठा समाजातील तरुणांना, आपल्या गावात आमरण उपोषण सुरू केलं असेल तर पोलीस ठाण्यात माहिती, अर्ज द्या. आत्महत्या करू नका, असं आवाहन करतानाच आपल्यातील एकजुटीत फुटू देऊ नका. सरकारशी संवाद नाही. आणखी 3 दिवस सरकारची वाट बघू. त्यांना माणुसकी समजत नसेल तर आमची ताकद त्यांना दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरक्षण देऊ असं का म्हणत नाहीत, फक्त सावंत का म्हणतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एकदा चर्चेला यावं, त्यांना कोणी अडवणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या आमरण उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस. पाचव्या दिवशी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली दिसून आली. जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांना निटसे बोलताही येत नव्हते.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे पथक रविवारीही तपासणी, उपचारासाठी दाखल झाले होते. परंतु, जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास, उपचार घेण्यास नकार दिला. जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा बांधवांनी एकजूट व्हावे. फुटू देऊ नये. महाराष्ट्रात जिथे, जिथे साखळी उपोषण आहे तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्यावा. जेणेकरून सरकारला किती ठिकाणी उपोषण सुरू आहे हे समजेल. उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून अद्याप संवाद साधण्यात आला नाही. प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेवू. मला बोलायला त्रास होतोय. मी जास्त बोलू शकत नाही, असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.