मुंबई, दि. 9 :- देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपटाला कर सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.
चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या 18 टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी 9 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची कर सवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्याने चित्रपटाला करसवलत दिली पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वित्त, महसूल व सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.