दावोसमध्ये महाराष्ट्राने केले ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार

0
2

१ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी स्वारस्य; २ लाख रोजगार निर्मिती होणार

पोलाद, आयटी, हरित उर्जा, कृषी, लॉजिस्टिक्, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक

मुंबई दिनांक 18 : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य  करार केले असून उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य  करार करीत असल्याची  माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाज माध्यमांतून दिली. याव्यतिरिक्त १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांमुळे राज्यात २ लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक वाढ

हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत, असे सांगतानाच उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी  महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ तारखेस ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. उद्या ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

गुंतवणूक करार झालेल्या उद्योगांची माहिती व रोजगार पुढीलप्रमाणे :

१६ जानेवारी – आयनॉक्स एअर प्रोडक्ट २५ हजार कोटी ( ५ हजार रोजगार ), बी सी जिंदाल ४१ हजार कोटी ( ५ हजार रोजगार), जेएसडब्ल्यू स्टील २५ हजार कोटी ( १५ हजार रोजगार), एबी इन बेव्ह ६०० कोटी ( १५० रोजगार), गोदरेज एग्रोव्हेट १००० कोटी ( ६५० रोजगार) अमेरिका स्थित डेटा कंपनी १० हजार कोटी ( २०० रोजगार)

१७ जानेवारी – अदानी ग्रुप ५० हजार कोटी ( ५०० रोजगार), स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ११५८ कोटी ( ५०० रोजगार), इंडियन ज्वेलरी पार्क ५० हजार कोटी ( १ लाख रोजगार), वेब वर्क्स ५ह्जार कोटी ( १०० रोजगार), लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस,इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून ३५०० कोटी ( १५ हजार रोजगार), नसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी २० हजार कोटी ( ४ हजार रोजगार)

महाप्रीत ने हरित उर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचे करार केले. ते पुढीलप्रमाणे आहेत 

अमेरिकास्थित प्रेडीक्शन्स समवेत ४ हजार कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी मध्ये ८ हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी ३००० मध्ये ४० हजार कोटी, व्हीएचएम ओमान समवेत ४ हजार कोटी

१८ जानेवारीस पुढील सामंजस्य करार होतील-  सुरजागड इस्पात १० हजार कोटी ( ५ हजार रोजगार), कालिका स्टील ९०० कोटी ( ८०० रोजगार), मिलियन स्टील २५० कोटी ( ३०० रोजगार), ह्युंदाई मोटर्स ७ हजार कोटी ( ४ हजार रोजगार ), कतारची एएलयु टेक समवेत २०७५ कोटी ( ४०० रोजगार), सीटीआरएल एस ( ctr s) ८६०० कोटी ( २५०० रोजगार)

१ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य

याशिवाय विविध उद्योगांनी १ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले असून यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे.

विविध उद्योग समूहांशी चर्चा यशस्वी

दावोस येथील महाराष्ट्र दालनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध उद्योग समुहांचे प्रमुख भेटले. त्यामध्ये अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र दालनात भेट घेतली. यावेळी त्यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी भविष्यातील गुंतवणकीच्या सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर लिंकस्टाईनचे युवराज यांच्याशी देखील औद्योगिक गुंतवणुकीबाबत संवाद साधण्यात आला.

फ्रेंच वाणिज्य कंपनी असलेल्या लुईस ड्रेफसचे मुख्य धोरणकर्ते अधिकारी थॉमस कौटॉडियर आणि मुख्य वित्त अधिकारी पॅट्रीक ट्रुअर यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विस्ताराबाबत यावेळी चर्चा झाली.

दक्षिण कोरीयाच्या ग्योग्नी प्रांताचे गव्हर्नर किम डाँग यिओन यांची मुख्यमंत्र्यांसमवेत आज भेट झाली. उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दक्षिण कोरियाचे कौशल्य आणि कुशल मनुष्यबळाच्या क्षेत्रातील भारताची ताकद यांच्यात समन्वय करून या क्षेत्रात महाराष्ट्रात  मजबूत पायाभरणी करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

चेक प्रजासत्ताक स्थित विटकोविट्झ अ‍ॅटोमिका कंपनीचे चेअरमन डेव्हीड क्रोबोक यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये छोटे मॉड्युलर अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा झाली. या करारांच्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत देखील मुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते.