पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची गाडी फोडली

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे:- पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. त्यांची गाडी फोडली आहे. पुण्यातील डेक्कन भागातील खंडोजी बाबा खोपडे चौकात त्यांच्या गाडीला भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. निखिल वागळे यांची गाडी पोलीस सुरक्षेत दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्र सेवा दल येथील नियोजित सभास्थळी जात होती. परंतु रस्त्यातच त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

पुण्यातील दांडेकर पुलावरील राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये आज निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण आहे. त्यांच्याबरोबर अँड. असीम सरोदे आणि समाजवादी नेते नितीन वैद्य यांचीही भाषणे होणार आहेत. मात्र, वागळे यांची सभा झाली तर कायदा सुव्यवस्था बिघडेल, त्यामुळे त्यांची ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता.

गाडीवर हल्ला झाल्यानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहे. कार्यक्रमस्थळी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे दणक्यात स्वागत केलंय. निखिल वागळे यांची मंचावर एन्ट्री होताच फुले शाहू आंबेडकरांच्या गगनभेदी घोषणांनी सभास्थळ दणाणून गेलं. काहीही होऊ द्यात आपण सभा घेऊ, असा निर्धार वागळे यांनी बोलून दाखवल्यानंतर जमलेल्या गर्दीने घोषणा देऊन वागळे यांना तुफान प्रतिसाद दिला. निखिल वागळे यांची सायंकाळी ६ वाजता नियोजित सभा होती. परंतु ही सभा होऊ नये, यासाठी भाजपचा तीव्र विरोध होता. निखिल वागळे जेव्हा सभास्थळी जायला निघाले, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीसही होते. परंतु पोलिसांची सुरक्षा असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीला दगडांनी लक्ष्य केले.