राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट,फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक

0
4

मुंबई :–राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट घोंघावत आहे. राज्यामध्ये ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल समोर आला आहे. आजच्या पाणीसाठा अहवालामधून ही माहिती मिळत आहे. अजून पावसाळ्याला दोन महिने अवकाश आहे, त्याअगोदरच पाणीसाठ्यामध्ये मोठी घट दिसून येत आहे.

कोकण विभागामध्ये एकूण जलसाठ्यापैकी ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर पुणे विभागामध्ये ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागामध्ये एकूण जलसाठ्यापैकी ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यामध्ये सर्वात‌ कमी म्हणजेच १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावतीमध्ये ४१ टक्के तर नागपुरमध्ये ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये २३८ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण २४ धरण या प्रकल्पांमध्ये अवघा २८.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये पाणीप्रश्न गंभीर होत चालल्याचं दिसत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये फक्त ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २३८ टँकरद्वारे सद्यस्थितीत २३० गावं आणि ४७७ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.

राज्यातील अनेक वाड्या वस्त्यांमध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. अनेकदा त्यांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याचं दिसत आहे. यंदा कमी पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीसाठ्यांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच प्रचंड हाल होत आहेत.

बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खाजगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 337 गावांना 443 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांसाठी लागणारा चारा आणि पाणी अपुरे पडत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा १७ टक्केवर आल्याने प्रशासनाने उद्योग आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हर्सूल तलावाची देखील भूजल पातळी आता ७.५ फुटापर्यंत घटली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये २७ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, भातसा या धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. या सात धरणांतून दररोज ३,९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.सातही धरणांची एकूण साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. सध्या सरासरी केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. साल २०२२ मध्ये ३६.७६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. ७ एप्रिल २०२३ रोजी ३३.९० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहचला आहे.