बुलढाणा, दि.२-खरीप व रब्बी हंगामातील पीक परिस्थिती, पाऊस, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी भेंडवळची घटमांडणी यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. त्याचे भाकीत दुसऱ्या दिवशी ११ मे ला पहाटे वर्तविण्यात येणार आहे.
पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीवर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके असे विविध अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ घटमांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. सामान्य जनतेत मांडणीची प्रचंड उत्सुकता असते.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या व पूर्णानदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून जपली जात आहे. यंदा घटमांडणी १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पूंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करणार आहेत.
अशी होते मांडणी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बसथांब्याशेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी असे अठरा प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पान-सुपारी, पुरी, पापड, सांडोळी-कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. दुसऱ्या दिवशी घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते. त्यावर भाकीत सांगितले जाते. बहुतांश वेळा हे भाकीत तंतोतंत खरे ठरल्याने शेतकरी त्यावरच पीक नियोजन करतात.
यंदा ‘राजा’चे काय होणार?
भेंडवळच्या घटमांडणीत राजकीय परिस्थितीचे भाकीतही करण्यात येते. घटमांडणीत असलेला पानविडा व सुपारी यावरून देशाचा राजा कायम राहणार की काही बदल होणार? याबाबत भाकीत करण्यात येईल. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकांना सुरुवात झाली असून ४ जून रोजी निकाल येणार आहेत. तत्पूर्वी राजकीय परिस्थितीबाबत भाकीत वर्तविण्यात येणार असल्याने लोकांची उत्सुकता वाढली आहे. मागील वर्षीच्या घटमांडणीत राजा कायम राहणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते.