लग्न समारंभ, मिरवणुकांत डीजेसाठी अटींवर मिळणार परवानगी
: अंगाचा थरकाप रोखण्यासाठी बुलढाणा एसपी ॲक्शन मोडवर
बुलढाणा, दि. २ –जमीन आणि घरांना हादरे बसविणारा ‘डीजे’ मानवासोबतच मुक्या जीवांसाठी किती घातक आहे, हे कर्णकर्कश आवाजच स्पष्ट करतो. आकर्षण वाढविण्याकरिता लावले जाणारे लेझर लाइट थेट डोळ्यांवर परिणाम करतात. हृदयाची स्पंदने वाढून अंगाचा थरकाप उडवतो, अस्वस्थ वाटते. शरीराचे कंपन होऊन एखाद्यावेळी व्यक्ती दगावू शकते. कान बहिरे होतात. वृद्ध आणि लहान मुलांसाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘डीजे’चा आवाज दाबण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या मदतीने कारवाईचे कठोर पाऊल उचलले आहे. वेळप्रसंगी गुन्हेही दाखल केले जातील.
यापुढे पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय डीजे वाजवू दिले जाणार नाहीत. जे अटी, शर्तीचे पालन करतील, सर्वोच्च न्यायालयाने ठरविलेल्या २० ते ७५ डेसिबल आवाजाच्या मर्यादेतच डीजे वाजवतील, त्यांनाच परवाना दिला जाईल, असे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात २२ डीजे जप्त करण्यात आले असून, त्यातील १४ डीजेधारकांना आरटीओंमार्फत ५ लाख २२ हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याचेही ते म्हणाले.
डीजे वाजविणाऱ्या डीजेधारकासोबतच ज्यांच्याकडे लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, जयंती मिरवणुका किंवा अन्य कार्यक्रम असतील, त्यांनी पोलिसांकडून परवानगी न घेतल्यास ते वरपिता अथवा कार्यक्रम, मिरवणुकांच्या आयोजकांनादेखील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
डीजेवाल्यांविरुद्ध आखलेल्या ॲक्शन प्लॅनची माहिती सांगताना पोलीस अधीक्षक सुनील कडासने म्हणाले, ज्या काही औचित्याबद्दल डीजे लावायचा असेल, त्या संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाण्यात आधी अर्ज करावा. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या २० ते ७५ डेसिबलदरम्यान आवाज ठेवावा, डीजेवर कुणाच्याही धार्मिक भावना दुखावतील, असे आक्षेपार्ह गाणे वाजवू नये, डीजेच्या वाहनावर अतिरिक्त स्पीकर लावू नयेत, वाहनामध्ये अतिरिक्त बदल करू नयेत, लेझर लाइट लावू नयेत, आरटीओ विभागाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, पीयूसी, वाहनाचे फिटनेस, वाहनाचे पासिंग, चालक परवाना गरजेचा आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास डीजेधारक आणि संबंधितांवरही कारवाई करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या हवाली केल्यानंतर डीजे वाहनाकडून ज्या, ज्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून येईल, त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रतिबंधात्मक आदेश पारित करीत गाइडलाइन दिल्या आहेत.
मंगल कार्यालयांना बजावणार नोटिसा
मंगल कार्यालयांमध्ये लग्न सोहळा आयोजित केला जातो. त्या मंगल कार्यालयासमोर अथवा लग्नस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर डीजे लावून रहदारीस अडथळा निर्माण केला जातो. डीजेमुळे कुठलेही विघ्न येऊ नये, याची दक्षता घेत जिल्ह्यातील सर्वच मंगल कार्यालयांच्या संचालकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.
आरसी नोंदणी प्रमाणपत्र
अटी, शर्थींचा भंग करणारा डीजे पोलिसांनी पकडल्यानंतर तो आरटीओंकडे पुढील कारवाईसाठी पाठविला जाईल. दंड भरल्यानंतरही त्याने वारंवार तीच चूक केल्यास आरसी (वाहन नोंदणी प्रमाणपत्र) निलंबित करण्यात येणार आहे. वाहनात काही बदल केले असतील, ते काढून डीजे वाहन पूर्ववत करून आणत नाही, तोपर्यंत आरसी निलंबित ठेवण्यात येईल, असे यावेळी उपस्थित मोटार वाहन निरीक्षक अमित महाजन यांनी सांगितले.