26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Top News राज्यात मुसळधार पाऊस;अतिवृष्टीमुळे ८६ बळी;गडचिरोलीचा विदर्भाशी संपर्क तुटला

राज्यात मुसळधार पाऊस;अतिवृष्टीमुळे ८६ बळी;गडचिरोलीचा विदर्भाशी संपर्क तुटला

0
429

आतापर्यंत ५१६.१ मि.मी. पावसाची नोंद

अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रायगडसह विदर्भातील चार जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे आतापर्यंत एकूण ८६ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १३१ जण जखमी झाले आहेत. तर या पावसामुळे राज्यात पाच जण बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्कालीन परिस्थिती अहवालातून समोर आली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत २४.१ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटक्यामुळे ५ राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील 30 मार्ग बंद झाले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या संपर्क राज्यातील इतर भागांशी पूर्णपणे तुटलेला आहे. जिल्ह्यातील वैनगंगा गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, कटनी, दिना, पामुला, गौतमा, पर्लाकोटा अशा अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. या नद्यांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत शेतांमध्ये पुराचे पाणीच पाणी शिरले आहे. भामरागड तालुक्यातील ५० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून या तालुक्यातील 100 गावे जिल्हा मुख्यालयाशी पूर्णपणे संपर्काच्या बाहेर आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून अनेक नद्यांना पूर आलाय. शिवाय सोमवारी दि.22 जुलै रोजी काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.रायगड, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गडचिरली या जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा भरवा. नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतीमध्ये शाळा भरू नयेत,अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारतर्फे रविवारी राज्य आपत्कालीन परिस्थिती अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार वरील बाब समोर आली आहे. या अहवालानुसार राज्यात १५ मेपासून ते रविवारपर्यंत ५१६.१ मि.मी इतक्या सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सततच्या या पावसामुळे आतापर्यंत ३०२ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २१ घरांचे नुकसान झाले असून २४१ जणांना सुरक्षित हलविण्यात आल्याची माहिती या अहवालानुसार समोर आली आहे. गेल्या २४ तासांत २४.१ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून गेल्या चोवीस तासांत घर कोसळल्यामुळे एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर एकजण बेपत्ता असून एका प्राण्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सर्वाधिक बळी मुंबई शहरात

या अहवालानुसार मुंबई शहरात एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरात चार जणांचा तर पुणे जिल्ह्यात सहा जणांच्या मृत्यूची नोंद १५ मे ते २० जुलै या कालावधीत नोंदविण्यात आली आहे. लातूर येथे सात जणांचा, नागपूर येथे सहा आणि यवतमाळ येथे पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पालघर आणि ठाण्यात एनडीआरएफचे पथक

मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक तैनात ठेवण्यात आले आहेत. यात पालघर, ठाणे, रागयड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग येथे एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आल्या आहेत. तर गडचिरोली आणि नांदेड येथे एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत.blank

राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, पालघर, गडचिरोली, नाशिक, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंडिया आणि अकोला या जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये ६४.५ ते ११५.५ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

इरई धरणाची सर्व 7 दारे पुन्हा 1 मीटरने उघडली

चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व 7 दारे पुन्हा 1 मीटरने उघडली आहेत. 462 क्यूसेक्स वेगाने धरणातील पाण्याचा इरई नदीपात्रात विसर्ग होतोय. सध्या वर्धा नदीत पाणी कमी असल्याने इरई नदीतील पाणी वेगाने पुढे जात आहे. मात्र गोसेखुर्द धरणाचा विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली तर त्याचा आधी वर्धा आणि त्यानंतर इरई नदीच्या पाणीपातळीवर परिणाम होणार आहे.

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस पडत आहे. यासोबतच धापेवाडा बॅरेजचे 21 गेट चार मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून 2 लाख 85 हजार 768 क्युसेक पाण्याचा होत असलेला विसर्ग हा गोसीखुर्द धरणात विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी, गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. गोसीखुर्द धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आता गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे एक मीटरनं उघडण्यात आले आहे. सध्या गोसीखुर्द धरणातून 2 लाख 47 हजार 776 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यापूर्वी गोसीखुर्द धरणाचे 23 गेट एक मीटरनं तर 10 गेट अर्धा मीटरनं सुरू करण्यात आली होती. त्यात आता धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ झाल्यानं आता सर्वच्या सर्व 33 गेट एक मीटरनं उघडण्यात आली आहे. मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं गोसीखुर्द धरणातून विसर्ग करण्यात येणाऱ्या जलसाठ्यात आता वाढ केली आहे. त्यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पंचगंगा नदी पुलावर पुराचे पाणी

कुरुंदवाड, इचलकरंजी, पंचगंगा नदी पुलावर पुराचे पाणी आले आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी कुरुंदवाडला जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील शिरडून गावाजवळील पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला आहे. सध्या ही वाहतूक दुसऱ्या मार्गाने फिरवण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेल्यात आहेत. तसेच कर्नाटकलाही जोडणारे काही रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वर्धा नदीवरुन वाहतूक बंद

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील कोसारा पुलावर पाणी आले आहे. पुलावरून पाणी वाहत आल्याने वडकी वरोरा मार्ग बंद झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा हा वर्धा नदी असलेला कोसारा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद केली आहे.