अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याआधी भामरागडमध्ये बॉम्बस्फोट

0
112

गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील नक्षलप्रभावित भामरागड येथे पर्लकोटा नदीजवळ नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथे स्फोट झाल्याची घटना १६ नोव्हेंबरला सकाळी उजेडात आली. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उद्या गृहमंत्री अमित शहा प्रचारसभेसाठी गडचिरोली येत आहेत. नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.नक्षलप्रभावित भामरागडजवळील पर्लकोटा नदीवरी नवीन पूल बनवला जात आहे. त्यासाठी तेथे काही मजूर काम करतात. या पुलाशेजारी स्फोट घडल्याची खात्री केली आहे. त्यात तथ्य आहे. या स्फोटाबद्दल अधिक चौकशी सुरू आहे. परिसरात शोधमोहीम सर्च ऑपरेशन सुरू आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पोलीस यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीवरी नवीन पूल बनत आहे. त्यासाठी तेथे काही मजूर काम करतात. या पुलाशेजारी रात्री मोठा आवाज झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, सकाळी पोलिसांनी तपासणी केली असता स्फोटाच्या ठिकाणी चुन्याने ओढलेल्या रेषा दिसून आल्या. या परिसरात सध्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. नक्षली अनेकदा जमिनीत स्फोटके पेरुन ठेवतात, त्यानंतर स्फोट घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा धोका नको म्हणून पोलिसांनी परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केली जात असून या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तूर्त या मार्गावरील वाहतूक देखील रोखून धरली आहे. भामरागड हा छत्तीसगडला चिकटून असलेला परिसर आहे.
गेल्या काही दिवसांत पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्याने नक्षल्यांची काहीशी पिछेहाट झाली आहे. मात्र, अधूनमधून त्यांच्या कुरापती सुरु असतात. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याआधी स्फोट घडवून नक्षल्यांनी सुरक्षा यंत्रणेला आव्हान दिल्याचे पाहावयास मिळत आहे.
गृहमंत्र्यांचा इशारा अन् स्फोटाच्या योगायोगाची चर्चा
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी १५ नोव्हेंबरला चंद्रपूरच्या सभेत गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आला. ३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधील नक्षलवाद संपवू अशी घोषणा केली. सोबतच उद्या १७ नोव्हेंबरला ते गडचिरोलीत येणार आहेत. या घोषणेनंतर काही तासांतच भामरागडमधून स्फोटाची बातमी आली. त्यामुळे गृहिमंत्र्यांचा नक्षल्यांना इशारा अन् स्फोटाची घटना या योगायोगाची चर्चा होत आहे.