तिरोडा,दि.१५: शहीद मिश्रा बुनियादी शाळेच्या परिसरात आयोजित राजकीय सभेसाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या १८ नोव्हेंबरला होणार्या तिरोडा येथील जाहीर सभेच्या ठिकाणी आगमनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या गेटाजवळ असलेली झाडे जेसीबी लावून कापण्यात आली. या प्रकाराने पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये झाडे सुरक्षित होती
यापूर्वी, या ग्राऊंडवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली होती. त्यावेळी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील झाडे सुरक्षित होती. मात्र, आता राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमासाठी झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यांवर परिणाम,पर्यावरण आणि राजकारणाचा संघर्ष
शाळेच्या परिसरात झाडे तोडल्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. झाडांची सावली गमावल्याने उन्हाळ्यात होणारा त्रास वाढणार आहे. शाळेचा परिसर स्वच्छ आणि हिरवागार ठेवण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न यामुळे वाया गेले आहेत.
या घटनेवरून राजकीय सभांसाठी पर्यावरणाचे नुकसान करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. झाडे जपण्याचे महत्त्व सगळ्यांना माहीत असूनही राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांसाठी पर्यावरणाचा बळी का दिला जातो, याबाबत चर्चा रंगली आहे.
नागरिकांचा संताप,जवाबदार कोण?
स्थानीय नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झाडे कापणे हा फक्त पर्यावरणाचा अपमान नसून, येणाऱ्या पिढ्यांसाठी धोका आहे, असे नागरिकांचे मत आहे. शाळेसारख्या ठिकाणी अशी कत्तल होणे खेदजनक असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.तिरोडा येथील या प्रकाराबाबत प्रशासनाने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या घटनेचा अधिक तपास होणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांनी आपल्या सभांसाठी पर्यावरणाचे नुकसान थांबवावे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.