महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, आता मुख्यमंत्रीही फडणवीसच होणार?

0
177

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज 23 नोव्हेंबररोजी जाहीर होत आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत त्यानुसार महायुतीच्या 200 हून अधिक जागा आघाडीवर आहेत. त्यात एकट्या भाजपालाच येथे 111 जागा मिळाल्या आहेत.नागपूर दक्षिण-पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ एक महत्वाचा मतदारसंघ आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा बालेकिल्ला आहे. फडणवीस यांनी या मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक केली असून आता ते चौथ्यांदा येथून निवडणुकीसाठी उभे होते. फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसने या मतदारसंघातून प्रफुल्ल गुडधे (पाटील) यांना रिंगणात उतरवलं. फडणवीस यांनी आपला गड या विधानसभेत कायम राखला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय झाला आहे.

महायुतीमध्ये भाजप 110 जागा, एकनाथ शिंदे गट 49 जागा तर अजित पवार गट 34 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 83 जागांची आघाडी मिळाली आहे. यामध्ये कॉँग्रेस 26 जागा, उद्धव ठाकरे गट 30 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा 21 जागांवर आघाडीवर आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

या दरम्यान भाजपा नेते प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं भाष्य केलं आहे. “लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केळे. धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है चा नारा जनतेने मान्य केला आहे. आता राज्याचा विकास वेगाने होईल. महायुतीने 200 जागांवर आघाडी घेतली आहे. मी जनतेला नमन करतो, लाडक्या बहिणींना सलाम करतो. एवढंच नाही तर खरी शिवसेना कोण याचं उत्तरही जनतेने दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.”, असं दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, महायुतीचा पहिला विजय समोर आला आहे. श्रीवर्धनमधून अदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत. महायुतीचे अनेक बडे नेते हे सध्या आघाडीवर दिसून येत आहेत.तर, राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने अद्याप भोपळा देखील फोडलेला नाही. आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार, सर्व एक्झिट पोल राज्यात फेल ठरले आहेत. राज्यात भाजपाची त्सुनामी आल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीची पिछाडी

भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते अजूनही पिछाडीवर असल्याने आता विरोधी पक्षाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडते, ते पाहणे देखील उत्सुकाचे ठरणार आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार, असं चित्र आता दिसून येत आहे.