गोंदिया जिल्ह्यात लाडक्या बहिणींचा प्रभाव,चारही जागा महायुतीच्या ताब्यात

0
1299

गोंदिया,दि.२३ः-राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज(दि.२३)सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे.सुरवातील पोस्टल मतमोजणी आधी करण्यात आली.यात भाजपने आघाडी घेतली.त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरवात करण्यात आली.या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच भाजप महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार कमी करण्यात अपयशी ठरले.यावरुन महायुतीच्या लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव या निवडणूकीत स्पष्टपणे जाणवला.लाडक्या बहिणींनी एकतरफा मतदान महायुतीच्या पारड्यात दिल्याने गोंदिया जिल्ह्यातील चारही जागावर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाकडे वाटचाल केली असून यांचा विजय फक्त घोषित करणे उरले आहे.

या निवडणूकीत पहिल्यांदाच गोंदिया विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आपल्या विजयाचा जल्लोष करीत असून पहिल्यांदा कमल विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून फुलले आहे.विनोद अग्रवाल यांनी 9 व्या फेरीत 25 हजार 316 मतांची आघाडी घेतली आहे.

तिरोडा विधानसभा मतदारसंघातही विजय रहागंडाले यांनी आपली हॅट्रिक केली असून लाडक्या बहिणींनी त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यामध्ये नाराजी असतांना सुध्दा विजयाची माळ गळ्यात पाडली आहे.याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवीकांत बोपचे यांना मात्र दुसर्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.गेली पाच वर्ष मतदारसंघात सातत्य टिकवून सुध्दा मतदारांनी त्यांना नाकारले.विजय रहागंडालेनी 9 व्या फेरीत 21 हजार 826 मतांची आघाडी घेतली असून हा आघाडी कमी होणे शक्य दिसून येत नाही.

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करण्यास सुरवात केली.या मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुगत चंंद्रिकापूरे पाहिजे तसा कमाल करु शकले नसल्याचेही दिसून आले.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात कायम ठेवला.13 व्या फेरी अखेर राजकुमार बडोले हे 15,345 मतांनी आघाडीवर होते.

तर आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघात भाजपने हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडून आपल्या ताब्यात हिसकावला आहे.माजी आमदार संजय पुराम यांनी काँग्रेसचे नवखे उमेदवार राजकुमार पुराम यांचा पराभव केला आहे.संजय पुराम यांनी 15 व्या फेरीत सुमारे 32,122 हजाराची आघाडी घेतली आहे.