गोंंदिया,दि.२३-गोंदिया विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे असलेले वर्चस्व मोडीत काढत २०१९ च्या निवडणूक अपक्ष निवडून येत विनोद अग्रवाल यांनी इतिहास रचला होता.तर २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत तब्बल ६२ वर्षानंतर गोंदिया विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा कमल फुलवित विनोद अग्रवाल यांनी विजय मिळविला आहे.पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या महायुती भाजपच्या उमेदवाराने अखेर पर्यंत आघाडी कायम ठेवली.पहिल्या ५ फेरीनंतरच भाजप व विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरवात करीत फटाक्यांची आतषबाजी केली.
विनोद अग्रवाल हे विजयाची जशीजशी घोडदौड करीत होते,तस तसे कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येत होता.आमदार अग्रवाल यांच्या कार्यालय व निवासस्थानासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.तर विजयाचीखात्री पटल्यानंतर आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या मातोश्रीचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात १९९५ आणि १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यास विरोधकांना यश आले. युतीच्या माध्यमातून शिवसेनेचे रमेश कुथे यानी दोनदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा आपले वर्चस्व स्थापन केले. आतापर्यंत झालेल्या एकूण १४ निवडणुकापैकी ११ वेळा काँग्रेस तर दोन वेळा शिवसेनेला व एकदा अपक्ष उमेदवाराला गड सर करता आला आहे.या मतदारसंघात सन १९६७ पासून भारतीय जनसंघ, जनता पार्टी आणि आताचा भाजप पक्ष काँग्रेसला आव्हान देत आहेत.मात्र या मतदारसंघाचा इतिहास पाहता एकदाही भाजपच्या नावावर विजयाची नोंद या ६२ वर्षात झाली नव्हती ती या २०२४ च्या निवडणूकीत झाली आहे.