देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!

0
273

मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री अशी सर्व पदे भूषवलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. अनेक राज्यातील मुख्यमंत्ऱ्यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा आज शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत.

शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी
अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, रणविर सिंह, रणबीर कपूर या बॉलीवूड कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील सोहळ्यासाठी उपस्थित झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील मंचावर उपस्थित होते.

आज मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा ‘महा’शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, 22 राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि 40 हजार नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात विविध ठिकाणी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असं लिहिण्यात आलं होतं.