नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत रस्ते अपघातांबाबत धक्कादायक माहिती सांगितली. वर्षभरात देशामध्ये १ लाख ६८ हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली.
नितीन गडकरी म्हणाले की, देशात २०२२ मध्ये एकूण ४ लाख ६१ हजार ३१२ रस्ते अपघात झाले आहेत. या लोकांचा मृत्यू कोणत्याही दंगलीत किंवा लढाईत झाला नाही तर रस्ते अपघातात झाला आहे. केंद्र सरकारने रस्ता सुरक्षा समिती नेमली आहे आणि ब्लॅक स्पॉट्ससाठी ४० हजार कोटी रुपये दिले आहेत. तरीही रस्ते अपघातात वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितले. खासदार हनुमान बेनिवाल यांनी रस्ते अपघातासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, रस्ते अपघात एक अतिशय गंभीर समस्या आहे. यामागे वेगवेगळी कारणे आहेत. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये १८ ते ३४ वर्षे वयोगटातील मुले-मुलींचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच, २०१८ ते २०२२ या काळात देशात ७ लाख ७७ हजार ४२३ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१८-२०२२ दरम्यान रस्ते अपघातात ७,७७,४२३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्र सरकारने रस्ता सुरक्षा समिती नेमली आहे आणि ब्लॅक स्पॉट्ससाठी ४० हजार कोटी रुपये दिले आहेत. तरीही रस्ते अपघातात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे नितीन गडकरी म्हणाले की, हेल्मेट न घातल्यामुळे ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. देशातील नागरिकांनी रस्त्याचे नियम पाळले पाहिजे. नियमांचे पालन न केल्यास वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रक्कमेत वाढ केली. तरीही लोक नियम मोडतात. यामुळे अपघातांची संख्या वाढत जात आहे. यापूर्वी दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होत होता. मात्र, यामध्ये वाढ झाली आहे. सरकारच्या प्रयत्नांनतरही रस्ते अपघातात वाढ झाल्याचे दु: ख असल्याचे गडकरी म्हणाले.
टोल वसुलीसाठी नवीन प्रणाली येणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की, संसदेच्या पुढील अधिवेशनापूर्वी टोल वसुलीसाठी नवीन प्रणाली येणार आहे. महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल, वाहनांना कुठेही थांबावे लागणार नाही. अशी नवीन प्रणाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेवढा प्रवास केला जाईल, तेवढाच टोल वसुल केला जाईल त्यांनी सांगितले.