शिवजयंतीसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्या ‘या’ सूचना

0
128

मुंबई,दि.१३ः- येत्या 19 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त केंद्र सरकारने राज्य सरकारला  विशेष सूचना दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला सकाळी 7.30 वाजता या पदयात्रेचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करतील. त्यांच्या हस्ते उद्घाटन आणि मार्गदर्शन झाल्यानंतर, प्रत्येक जिल्ह्यात सकाळी 8.30 वाजता पदयात्रेला सुरुवात होईल.

पदयात्रेचा मार्ग आणि सहभाग

प्रत्येक जिल्ह्यातील ही पदयात्रा 6 किलोमीटरची असेल. यात मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी आणि तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असेल. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया  हेदेखील या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार आहेत. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) 395 वी जयंती आहे. यानिमित्ताने त्यांची लष्करी क्षमता आणि आदर्श राज्यकारभार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राजकोट किल्ल्यावरील  पुतळ्याचे काम

मालवणमधील (Malvan) राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्याचे 90% काम पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथून खडकासारखा दिसणारा बेस आणण्यात आला आहे, जो चबुतऱ्याला लावला जाईल. त्यामुळे शिवराय एका खडकावर उभे राहून समुद्राकडे पाहताना दिसतील.

शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण

पुण्यातील  आंबेगाव  येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या (Shivsrushti) दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण 19 फेब्रुवारीला शिवजयंतीदिनी  होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. या टप्प्यात रायगड , लोहगड  किल्ल्यांची प्रतिकृती आणि प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेचे (Tuljabhavani) मंदिर उभारण्यात आले आहे.