वेगळ्या विदर्भावरुन परिवहन मंत्री रावते व भंडाराचे आ.अवसरेत जुंपली

0
9

विशेष प्रतिनिधी
मुंबई,दि.29 : विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विदर्भाच्या मु्द्याला घेऊन सत्ताधारी भाजप सेनेमध्येच चांगले राजकारण रंगल्याचे चित्र समोर आले. आज शुक्रवारला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि भाजपा आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. भाजपा आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते त्यांच्या अंगावर धावून गेल्याने काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता.यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन आणि भाजप आमदार राम कदम यांनी रावतेंना अडवले. विदर्भातील भाजप आमदार आशिष देशमुख, विकास कुंभारे,सुधाकर देशमुख, रामचंद्र अवसरे यांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या असता शिवसेनेचे आमदार व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भंडाराचे भाजप आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांच्याशी बाचाबाची झाली.अवसरेनी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी भाजप आमदारांनी केली. त्यामुळे विरोधी पक्षांसह सत्ताधारी शिवसेनेचे आमदारही भाजपविरोधात आक्रमक झाले.सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
खासदार नाना पटोले यांनी स्वतंत्र विदर्भ प्रस्ताव लोकसभेत ठेवला, हे गंभीर आहे. ठराव लोकसभेत आणला, त्याआधी चर्चा झाली. राज्याचे तुकडे करण्याची भाषा आहे. सरकारची भूमिका काय? राज्य सरकारची भूमिका समजली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.भाजपचे खासदार अशासकीय ठराव आणूच कसा शकतात? वेगळा विदर्भ हे मुख्यमंत्र्यांचंही मत आहे का, असा सवाल अजित पवारांनी केला. तसंच शिवसेनेनं स्वतःची भूमिका जाहीर करण्याचं आवाहनही त्यांनी केले.

लोकसभेतील प्रस्तावावरुन विधानपरिषदेत गोंधळ
लोकसभेत आज भाजपचे खासदार नाना पटोले यांनी वेगळ्या विदर्भाबाबतचा अशासकीय प्रस्ताव मांडला. त्याबाबत राज्यातल्या युती सरकारची नक्की काय भूमिका आहे, याबाबत सरकारने निवेदन करावे, अशी मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली.यावेळी शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनीही चर्चेची मागणी केली.पटोले यांच्या भूमिकेशी सहमत नाही, असं सत्ताधाऱ्यांपैकी कोणीही उठून का सांगत नाही, असा सवाल यावेळी नारायण राणेंनी केला.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विधीमंडळ परिसरात भाजप आमदारांनी वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी केली. त्याला उत्तर म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकत्र येऊन अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या.

धनंजय मुंडेंचा सरकारवर आरोप
भाजपचे खासदारांनी स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव लोकसभेत आणलाय. अखंड महाराष्ट्रावर सरकार चर्चा कधी करणार असा सवाल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारला.
सरकार उत्तर का देत नाही. अखंड महाराष्ट्रावर सरकार बोलत नाही, म्हणजे ते वेगळा विदर्भाच समर्थन करतं, असा आरोप करत विरोधकांनी विधानपरिषद घोषणाबाजीने दणाणून सोडली.या सगळ्या गदारोळामुळे विधानपरिषदेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.