एसटी चालकांचा मृतदेह आंजर्लेच्या किनाऱ्यावर

0
11

विशेष प्रतिनिधी
मुंबई/रायगड/आंर्जेल, दि. ४ – महाड दुर्घटनेतील एसटी चालक एस.एस.कांबळेंचा मृतदेह दापोलीतील आंर्जेले येथील समुद्र किना-यावर सापडला आहे. दुर्घटनास्थळापासून ७० किमी अंतरावर हा मृतदेह सापडला. मृतदेहावर ८२३४ बॅच नंबर आहे. एस.एस.कांबळे जयगड-मुंबई एसटीबसचे चालक होते. महाड दुर्घटनेतील सापडलेला हा तिसरा मृतदेह आहे. यापूर्वी काल दोन मृतदेह सापडले होते. सावित्र नदीवरील जुना ब्रिटीशकालीन पूल कोसळल्यानंतर दोन एसटी बससह वाहून गेलेल्या वाहनांपैकी एकही वाहन अद्यापपर्यंत सापडलेले नाही.

आंजर्लेच्या किनाऱ्यावर सापडेलल्या मृतदेहाच्या अंगावर खाकी रंगाचे कपडे आहेत. त्यामुळे तो मृतदेह एसटी चालक एस. ए. कांबळे यांचाच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबरोबरच हरीहरेश्वर किनाऱ्यावर एका महिलेचा मृत देह सापडला असून, ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आंजर्ले आणि हरीहरेश्वरचे किनारे दुर्घटना ठिकाणापासून सुमारे 70 किमी अंतरावर आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील राजेवाडी येथे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून एसटीच्या दोन बससह चार-पाच वाहने बुडाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मंगळवारी (ता. २) रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुमारे ३० जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नौदल, तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) पथके नदीत वाहून गेलेल्या बस व इतर वाहनांसह प्रवाशांचा शोध घेत आहेत.

बुधवारी रात्री पावसामुळे बंद करण्यात आलेले बचावकार्य आज सकाळपासून पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे. मॅग्नेटच्या साहाय्याने नदीत वाहनांचा शोध घेण्यात येत आहे. अद्याप काही लागलेले नाही. 12 बोटींच्या सहाय्याने पुन्हा शोध मोहिम सुरु आहे. 165 जवान सहभागी असून, स्कूबा ड्रायव्हिंग पथक घटनास्थळी आहेत. पूर ओसरत नसल्याने शोध मेहिमेत अडचण निर्माण होत आहे.