बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कालची रात्र जामठा स्टेडियम जवळ महामार्गावरच झोपून काढली आहे. अजूनही बच्चू कडू यांच्यासोबत शेकडो आंदोलन महामार्गावर बसून आहेत. त्यामुळे नागपूर वर्धा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. शिवाय जामठा येथून जाणाऱ्या जबलपूर हैदराबाद महामार्गावर ही आंदोलन बसल्याने काही अंशी त्या ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली आहे. लोकांची कोंडी होत असली तरी शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे, त्याचं काय? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. चर्चेसाठी कृषिमंत्री महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री कोणी यावं अशी आमची अपेक्षा नाही. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे कर्जमाफी मिळावी ही अपेक्षा असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
जबललपूर – हैदराबाद महामार्ग बच्चू कडू यांच्या सोबत दाखल झालेल्या आंदोलकांनी रोखून धरल्याने दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनेक किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.. त्यामुळे खाजगी वाहनांनी किंवा st बसेस ने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांची मोठी अडचण झाली आहे.. तसेच धान्य, दूध, भाजीपाला, व इतर अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारे अनेक ट्रक्स ही महामार्गांवर थांबून आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत असून प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने यावर लवकर तोडगा काढावा अशी भावना व्यक्त केली जात आहे.
अनेक किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम, सामान्य नागरिकही अडकून पडले
बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलकांमुळे फक्त नागपूर – वर्धा महामार्गावरच कोंडी झालेली नाही, तर एका बाजूला नागपूर-अमरावती आणि दुसऱ्या बाजूला नागपूर – रायपूरला दरम्यानचे जे दोन समांतर महामार्ग आहे, त्यांना जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवर ही आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे आऊटर रिंग रोडवर ही कित्येक किलोमीटरपर्यंत ट्रक आणि अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे.
विविध उद्योगांमध्ये कच्चा माल घेऊन जाणार ट्रक, बाजारपेठांमध्ये भाजीपाला घेऊन जाणारे वाहन आणि नागपुरात काही कामानिमित्ताने खाजगी वाहनातून आलेले सामान्य नागरिक सर्वच आऊटर रिंग रोडवर अनेक किलोमीटरच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडले आहे. काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास आउटर रिंग रोडवरची वाहतूक आंदोलकांनी थांबवली होती, तेव्हापासून कित्येक तास जेवण पाणी शिवाय सामान्य नागरिक आणि ट्रकचालक अडकून पडले आहे.. ज्यांच्या मोबाईलला रेंज आहे ते आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकत आहे.. अन्यथा अनेकांचे स्वकीयांशी संपर्क सुद्धा होत नाही आहे.
बुटीबोरी ते जामठा रस्ता संपूर्णपणे आंदोलनामुळे जाम झाला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्धा मार्गांवर ठाण मांडल्याने मिहान पुलाखाली देखील चक्का जाम झाला आहे.महा एल्गारची धास्ती घेतलेल्या राज्यसरकारने सिव्हिल लाईन्स परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे संपूर्ण सिव्हिल लाईन्सला छावणीचे स्वरूप आले आहे. रोज सायंकाळ गजबजणारा वॉकर्स स्ट्रीट वाहतूकीस पूर्णपणे बंद करण्यात आला. रामगिरीकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून वाहतूक थांबवली आहे.




