मुंबई,दि.१३ः सह्याद्रीच्या खोऱ्यातून शिंगळा (कॅटफिश) माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यास ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश. पश्चिम घाटामध्ये ‘अमलीसेप्स’ वंशाच्या आढळाची आतापर्यंतची सर्वात उत्तरेकडील पुष्टी झालेली नोंद आहे. दुभंगलेली शेपूट, अपूर्ण मध्य रेखा, शेपटीच्या मध्यभागी असणाऱ्या शिरांमध्ये आकड्यासारख्या आकाराचा अभाव अशी नव्या माशाची वैशिष्ट्ये आहेत.
शिंगळ्याच्या नव्या प्रजातीचा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी असलेले वाळू, गोटे आणि दगड यांचे मिश्रण नव्या दुर्मिळ माशाला लपण्यासाठी तसेच अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास उपलब्ध करून देते.
संशोधनामध्ये स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे व अभिषेक शिर्के यांनी सहभाग घेतला. फाऊंडेशनने यापूर्वीही दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला असून संशोधन कार्याची देश-विदेशात दखल घेतली गेली आहे. शेपटीच्या ‘डोर्सल प्रोकरंट’ (पृष्ठीय प्रवाह) भागास एकरूप न होता स्पष्टपणे वेगळा असलेल्या ‘अडिपोझ फिन’ची रचना वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. ‘अमलीसेप्स वायव्य’ या नव्या प्रजातीचा शोध पश्चिम घाटात संवेदनशील अधिवासाच्या पर्यावरणीय अभ्यासाची गरज अधोरेखित करीत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांच्या संशोधन कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.





