नागपूर: एकेकाळी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हरित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या हवेची गुणवत्ता आता चिंताजनक पातळीवर घसरली आहे. वाहनांमधून निघणारे घातक वायू आणि वाढते धूलिकण यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच वातावरणावर परिणाम होत असून पिकांचेही नुकसान होत आहे. वाहनांमधूनच सर्वाधिक वायूचे उत्सर्जन
शहरातील प्रदूषणात वाहनांचा ४७ टक्के वाटा असून, ते सर्वाधिक प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. नीरीच्या आकडेवारीनुसार वाहनांच्या धुरातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंमध्ये कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण ५७.४ टक्के इतके आहे. त्याखालोखाल नायट्रोजन ऑक्साईड २३.४ टक्के, हायड्रोकार्बन १५.६ टक्के आणि सुक्ष्म धूलिकण ३.६ टक्के वातावरणात मिसळतात. हे वायू मानवी श्वसनसंस्थेवर थेट परिणाम करत असून, हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे.
“नागपूरकरांचा प्रत्येक श्वास सूक्ष्म कण आणि घातक वायूंनी भरलेला आहे. त्याचा परिणाम दररोज सुमारे अडीच सिगारेट ओढल्यासारखा होतो. यामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, श्वसन व हृदयविकारांचा धोका वाढणे दिसून येत आहे. विशेषतः लहान मुलांच्या फुफ्फुसांवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहार, पुरेसे पाणी, व्यायाम, धूम्रपान टाळणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.”
– डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ
ई-वाहने : स्वप्न मोठे, अडचणी अनेक
इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशनची अपुरी संख्या आणि बॅटरीची जास्त किंमत हे मोठे अडथळे आहेत. दुचाकी इव्ही पेट्रोल वाहनांच्या तुलनेत महाग असतात, तसेच बॅटरीची किंमत वाहनाच्या ३० ते ४५ टक्क्यांपर्यंत असते. याशिवाय बॅटरीचे आयुर्मान ३ ते ५ वर्षे इतके मर्यादित असल्याने सर्वसामान्यांना हा पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. विशेष म्हणजे, वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशामुळे अप्रत्यक्षपणे प्रदूषण वाढत असल्याने ई-वाहने खरोखरच पूर्णतः ‘स्वच्छ’ पर्याय ठरतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वायू प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम
श्वासाचे त्रास : सतत खोकला येणे, जुनाट खोकल्याचा त्रास वाढणे
अस्थमा (दमा) : श्वास घेताना शिटीसारखा आवाज येणे, छातीत कफ साचणे
फुफ्फुसांचे नुकसान : विषारी वायूंमुळे कॅन्सरचा धोका वाढणे
लहान मुलांवर परिणाम : फुफ्फुसांची वाढ मंदावणे, सर्दी-खोकल्याचा त्रास





