नागपूर – अडीच आठवड्याच्या हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. आता पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून मुंबई येथे होणार आहे. हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या तेरा बैठका झाल्या असून ११ विधेयके संमत करण्यात आली. विधान परिषदेत एकूण ७५ तास ५० मिनिटे कामकाज झाले. यापैकी २३ मिनिटे मिनिटे मंत्री अनुपस्थित असल्याने आणि २२ तास २० मिनिटे इतर कारणांमुळे वाया गेले. दिवसाला सरासरी ५ तास ५० मिनिटे असे कामकाज झाले. अधिवेशनात ८६३ तारांकित प्रश्न, ४६ औचित्याचे मुद्दे, ८८९ लक्षवेधी, १३९ विशेष उल्लेख आणि ३ अल्पावधीच्या सूचना सभागृहासमोर ठेवण्यात आल्या. विधानसभेमध्ये एकूण ८७ तास २० मिनिटे कामकाज झाले. त्यापैकी ८ तास ४५ मिनिटे विरोधकांचा गदारोळ आणि मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे व्यर्थ गेले. दिवसाला सरासरी ६ तास ४० मिनिटे कामकाज झाले. अधिवेशन काळात ६४० तारांकित प्रश्न, ९ अल्प मुदतीच्या चर्चा, ९७ लक्षवेधी आणि १९९ अर्धा तास चर्चा सभागृहासमोर ठेवण्यात आल्या.