नवी दिल्ली दि. 26 : राज्यातील नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी औद्योगिक निती, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज, राज्यातील वेगवर्धित सिंचन प्रकल्पांना केंद्राकडून वाढीव मदत मिळावी, अरबीसमुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणीसाठी केंद्राची मदत मिळावी आदी मागण्या महाराष्ट्राचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे केल्या. राज्याचा विकास दर वाढविण्यासाठी केंद्राच्या मदतीची आवश्यकता असल्याचे नमूद करत केंद्रीय अर्थसंकल्प 2015 मधे महाराष्ट्राला मोठा वाटा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय अर्थसंकल्प 2015 बाबतच्या चर्चेसाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अशोक हॉटेल येथे बोलविलेल्या देशातील सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा आणि विविध राज्यांचे अर्थमंत्री यावेळी उपस्थित होते. राज्याच्या अर्थ विभागाचे प्रधान सचिव सुधीर कुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्रात एकूण 36 पैकी 4 जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. 6 जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत. राज्यातील नक्षलग्रस्त भागात उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन उद्योगनिती तयार करण्यात येत आहे. त्यानुसार ‘इन्कमटॅक्स हॉलीडे’ आणि ‘कस्टम हॉलीडे’अशा सोयी सवलती देवून उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेची महाराष्ट्रात आवश्यकता आहे.