हिंदू धर्मातून ६००० ओबीसींची ‘घरवापसी’!

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई-भारताला पुन्हा एकदा ‘हिंदुराष्ट्र’ बनवण्याच्या उद्देशाने हिंदुत्ववादी संघटना मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांना हिंदू धर्मात आणण्यासाठी ‘घरवापसी’ मोहीम राबवत असतानाच, हिंदू धर्मातील अनेक कुटुंबे ‘घरवापसी’ करून बौद्ध धर्मात जाण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी (इतर मागासवर्गीय) जातींमधील १६०० कुटुंबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी नोंदणी केली असून यामध्ये ब्राह्मण आणि मराठा जातीच्या कुटुंबांसह मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांचाही समावेश आहे. त्यांची संख्या सुमारे सहा हजार असल्याचे समजते. ओबीसी हे पूर्वी बौद्धच होते, त्यामुळे हे धर्मातर नसून स्वगृही परतणे आहे, असा त्यांचा दावा आहे.
भारतातील ओबीसींच्या अवनतीला हिंदूू धर्मातील जातीव्यवस्था कारणीभूत आहे, त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग हाच ओबीसींच्या उन्नतीचा मार्ग आहे, अशी भूमिका घेऊन ओबीसी नेते हनुमंत उपरे यांनी १४ ऑक्टोबर २०११ पासून ओबीसींच्या धर्मातरासाठी जनजागृती चळवळ सुरू केली. ‘ओबीसी बांधव आता धम्माच्या वाटेवर’, अशी घोषणा देत गेल्या तीन वर्षांत या चळवळीने महाराष्ट्र पिंजून काढला. सहा विभागांवर परिषदा आणि कार्यशाळा घेतल्या. १४ ऑक्टोबर २०१६ला ज्यांची धर्मातराची तयारी आहे, त्यांची नोंदणी सुरू केली. त्यानुसार आतापर्यंत १६७७ कुटुंबांची धर्मातरासाठी नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही ब्राह्मण, मुस्लीम, ख्रिचन व मराठा समाजातील कुटुंबेही पुढे आली आहेत. त्यांचीही नोंदणी करण्यात आली आहे, असे उपरे यांनी सांगितले.