निधीअभावी पाटबंधारे विभाग खिळखिळा

0
17

चुल्हाड (सिहोरा) : मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयावर नियंत्रण ठेवणारा सिहोरा येथील लघु पाटबंधारे विभाग (राज्य) चे कार्यालय निधीअभावी खिळखिळा झालेला आहे. या विभागाचे दोन्ही विश्रामगृह दुर्लक्षित झाले असून रिक्त पदे टेंशन वाढविणारे आहेत. याशिवाय कोट्यवधीची मालमत्ता रामभरोसे आहे.

सिहोरा परिसरात शेती सुजलाम सुफलाम करणारा चांदपूर जलाशय आहे. या जलाशयाचे सिंचीत क्षेत्र ७,०२९ हेक्टर आर शेती आहे. ही शेती सिंचीत करण्यासाठी सिहोऱ्यात लघु पाटबंधारे विभाग (राज्य) चे कार्यालय आहे. या विभागात डावा आणि उजवा कालवा अशी विभागणी करण्यात आली असून स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. डावा कालवा यंत्रणेत शाखा अभियंत्याचे पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार उजवा कालव्याचे शाखा अभियंता यांना देण्यात आलेला असून १०,११७ हेक्टर शेती सिंचित करण्याची जबाबदारी आहे. यामुळे कामाचा वाढता व्याप आहे. याच विभागाचे रनेरा गावाच्या हद्दीत विश्रामगृह आहे. विश्रामगृहाची जिर्ण अवस्था झाली आहे. अनेक इमारतींचे छतांना छिद्र पडली आहेत. विश्रामगृहात कुणी ढुंकूनही पाहत नाही. खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात पाणी वाटप करणारी शेतकऱ्यांची सभा या विश्रामगृहात वर्षातून एकदा बोलाविण्यात येत आहे.

ही सभा आमदारांच्या उपस्थितीत होत आहे. सभा आटोपताच सारेच निघून जात आहे. परंतु विश्रामगृहाच्या देखभाल आणि दुरुस्तीकरिता प्रयत्न होत नाही. या विश्रामगृहाच्या परिसरात मौल्यवान सागवनाची वृक्ष आहेत. तारेचे कुंपण तुटल्याने ही वृक्ष आता असुरक्षित आहेत. याच आवारात वज्रचुर्ण भांडार गृह असून अवस्था जीर्ण झाली आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावर असलेल्या या विश्रामगृहाकडे कुणाचे लक्ष जात नाहीत ही खरी शोकांतिका आहे. या विश्रामगृहाचे नवीनकरण करण्यासाठी पाटबंधारे विभाग दरवर्षी वरिष्ठ विभागांना प्रस्ताव देत आहे. परंतु अद्याप प्रस्तावांना मंजुरी मिळाली नाही. निधी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. सध्या कोट्यवधीची ही मलामत्ता भंगारात जात आहे.

वर्षानुनर्षे बांधकाम करण्यात आलेल्या खोल्याचे दरवाजे उघडण्यात आले नसल्याने गंज चढलेली आहेत. दस्तऐवज अस्तव्यस्त ठेवण्यात आली आहेत. याशिवाय पाटबंधारे विभागाचे साहित्य भंडारगृहात ठेवण्यात आली असली तरी सुरक्षा नाही. या परिसरात हा एकमेव विश्रामगृह आहे. विश्रामगृहाची सुरक्षा करणारी यंत्रणा नाही. यामुळेच साहित्य चोरट्याचे नजरा या विश्रामगृहाकडे खिळल्या आहेत. घाण, केर कचरा अस्वच्छता या विश्रामगृहात दिसून येत आहे.

याच विभागाचे ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात विश्रामगृह आहे. पाणी वाटपात अधिकारी आणि कर्मचारी या विश्रामगृहाचा उपयोग करीत आहेत. विश्रामगृहात विजेची सोय आहे. परंतु पर्यटनस्थळ बंद होताच विश्रामगृहाची तोडफोड करण्यात आली आहे. दरवाजे आणि खिडक्या चोरीला गेलेल्या आहेत. सन २०१२ पर्यंत दर्जेदार असणारे हे विश्रामगृह आता भंगारात निघाले आहे. या परिसरात असणाऱ्या अन्य दोन इमारतीची दुरवस्था झाली आहे.

सिहोरा स्थित कार्यालय परिसरात वसाहत बांधकाम करण्यात आली आहे. परंतु या वसाहतीत कर्मचारी वास्तव्य करीत नाही. याच परिसरातील गावात वास्तव्य करणारे कर्मचारी आहेत.

यामुळे या कर्मचाऱ्यांचा अपडाऊन करण्याचा प्रश्न नाही. या वसाहतीत असणाऱ्या रिकाम्या खोल्या मंडळ कृषी कार्यालयाला प्रशासकीय कारभारासाठी देण्याची ओरड आहे. कृषी आणि पाटबंधारे विभाग राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत. रिकाम्या खोल्या भंगारात जाणे ऐवजी उपयोगात येतील अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. दोन्ही विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याची गरज आहे.