सरकारने 19 आमदारांची केली कत्तल – उद्धव ठाकरे

0
8

मुंबई,दि. 24 – महाराष्ट्रात रोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या ‘हत्या’च आहेत. शेतक-यांच्या कर्जमाफीची मागणी करणा-या १९ आमदारांची झालेली ‘कत्तल’ हे संसदीय नियमास धरून आहे, पण लोकभावनेच्या विरोधात आहे. विरोधकांचा मार्ग चुकला आहे, पण सरकारची दिशा तरी कुठे बरोबर आहे ? अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर तोफ डागली आहे.
गोंधळ घालणाऱ्या आमदारांचे निलंबन केल्याबद्दल सरकारचे कौतुक करावे काय? असा प्रश्न राज्यातील तमाम शेतकऱ्यांना आज पडला असेल. कर्जमुक्ती करता येणार नाही, देशाची आर्थिक शिस्त बिघडेल असे स्टेट बँकेच्या अध्यक्षा श्रीमती अरुंधती भट्टाचार्य आता सांगतात, पण उत्तर प्रदेशसारख्या २२ कोटी लोकसंख्येच्या राज्यातही ‘‘सत्तेवर आल्यास कर्जमुक्ती करू’’ असे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात आणि पंतप्रधानांच्या भाषणात आहे. श्रीमती भट्टाचार्य यांना विचारून हे आश्वासन दिले होते काय ? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.