शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची भाजपची तयारी?

0
18

मुंबई,दि.23-: मुद्दा कुठलाही असो, शिवसेनेचा सरकारला विरोध ठरलेला आहे. त्यामुळे वैतागलेल्या भाजप नेत्यांनी आता मध्यावधींना सामोरे जाऊ पण शिवसेना नको, असा सूर लावला आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेच्या वर्तणुकीवर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे,अशी महिती सुत्रांनी दिली आहे.महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या कायम असणाऱ्या विरोधी भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत यासंबंधी दोन पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून सातत्याने घेण्यात येत असलेली आडमुठी भूमिका, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांकडून झालेली कोंडी या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने राज्यात सरकार टिकवण्यासाठी नव्या समिकरणांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मिळून 29 आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याने पुढच्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.आज झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत मध्यावधी निवडणुका आणि भाजपाच्या संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 29 आमदारांना पक्षा प्रवेश देण्याच्या पर्यायावर चर्चा झाली.काँग्रेसचे 15 आणि राष्ट्रवादीचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. यातील 21 आमदार जे पुन्हा नक्की निवडून येऊ शकतात अशांना भाजप घेऊ शकते.या दोन्ही पर्यायांवर 50-50% मत कोअर कमिटीमध्ये पडली. त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत दिल्लीला कळवण्यात येणार आहे.