सरत्या वर्षात भारताने गमावले ६४ वाघ

0
13

वृत्तसंस्था
भोपाळ-भारतातूनच नव्हे तर जगाच्या नकाशावरून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असतानाच २०१४ या नुकत्याच संपलेल्या वर्षात भारताने तब्बल ६४ वाघ गमावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नुकत्याच सरलेल्या वर्षात विविध कारणांमुळे भारतात ६४ वाघांचा मृत्यू झाला आणि यामध्ये तामिळनाडू आघाडीवर आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संस्थेच्या (नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन ऍथॉरिटी) अहवालात म्हटले आहे.
गेल्या वर्षी तामिळनाडूत १५ वाघांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल मध्यप्रदेशाने १४ वाघ गमावले, असे टायगरनेटडॉटएनआयसीडॉटइन या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
एकेकाळी मोठ्या प्रमाणात वाघ असलेल्या मध्यप्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात गेल्या वर्षी सात वाघांचा मृत्यू झाला, तर कान्हा व्याघ्र प्रकल्पात चार वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पेंच आणि पन्ना या व्याघ्र प्रकल्पांमध्ये प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आणि बालाघाट जिल्ह्यातील जंगलातही एक वाघ मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती देण्यात आली आहे.
गेल्या व्याघ्र जनगणनेत कर्नाटकने मागे टाकल्यानंतर वाघांची राजधानी, असा दर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मध्यप्रदेशसाठी ही आकडेवारी धक्कादायक आहे.
ऑल इंडिया टायगर इस्टिमेशन एक्झरसाईज २०१० नुसार २००६ मध्ये मध्यप्रदेशात सुमारे ३०० वाघ होते. मात्र, २०१० मध्ये ही संख्या २५७ पर्यंत खाली आली. दुसरीकडे कर्नाटकात २००६ साली २९० असलेली वाघांची संख्या २०१० साली ३०० झाली. वाघांचा मृत्यू होण्याच्या बाबतीतही कर्नाटकात समाधानकारक स्थिती आहे. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०१४ या कालावधीत कर्नाटकात सहा वाघांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये आठ, कर्नाटकशिवाय महाराष्ट्र आणि आसाममध्ये प्रत्येकी सहा, बिहार व केरळमध्ये प्रत्येकी तीन, उत्तरप्रदेशात दोन आणि आंध्र प्रदेशात एका वाघाचा मृत्यू झाला.
गेल्या वर्षात मृत्युमुखी पडलेल्या ६४ पैकी चार वाघांचा मृत्यू आपसातील संघर्षामुळे झाला. पोलिस कर्मचारी व नेमबाजांच्या गोळीबारात दोन वाघ ठार झाले. एका वाघाचा मृत्यू न्युमोनियाने, तर आणखी एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला. उर्वरित वाघांच्या मृत्यूची अद्याप चौकशी सुरू आहे, असेही या साईटवर नमूद करण्यात आले आहे.
२०१० च्या व्याघ्र जनगणनेनुसार भारतात १,७०६ वाघ आहेत. २०१४ साली करण्यात आलेल्या व्याघ्र जनगणनेची नेमकी आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.