आमगाव-घरची परिस्थिती बेताची….बाबा पानठेल्याचा व्यवसाय करणारे…. कालांतराने आई समाजसेवेतून जनमतामुळे ग्रामपंचायत सदस्य झाली. घरात कलाक्षेत्राचा लवलेश नसला तरी आईवडील व भावाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. आईवडील व भावासाठीच या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी कठोर परिश्रम घेईल, असे मनोगत व्यक्त केले ते आदिवासी, नक्षलग्रस्त भागात वाढलेल्या २२ वर्षीय सोनू मनोहर डेकाटे हिने. तिला ‘डी फॅक्टरी’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात त्यामुळे एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असतानाच आमच्या प्रतिनिधीने तिच्या वाटचालीसह चित्रपटाबद्दल जाणून घेतले. स्वत:बद्दल व चित्रपटाबद्दल सांगताना सोनू म्हणाली, घरात नृत्य वा नाटकाची आवड नव्हती. परंतु आपल्याला लहानपणापासून नृत्य व अभिनयाची आवड आहे. याला प्रथम प्रोत्साहन दिले ते मोठा भाऊ स्व. किशोर डेकाटे यांनी… तर पानठेला चालवून संसाराचा रहाटगाडा हाकणार्या माझ्या बाबांसह आईनेही पुढे याच क्षेत्रात माझे जीवन घडावे, यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आमगाव तालुक्यातील एका छोट्या गावात शिक्षण घेत नृत्य व अभिनयाचे धडे कुठलाही गुरू वा मार्गदर्शन नसताना विविध भाषिक नृत्यांगणा व अभिनेत्यांना द्रोणाचार्य समजून स्वत:च परीश्रमाच्या बळावर गिरविले. त्याचाच परिपाक म्हणजे, आज मला प्रत्यक्षात मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. नागपूर येथे तयार होत असलेल्या ‘डी फॅक्टरी’ या मराठी चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी सोनूची निवड झाली आहे. ‘डी फॅक्टरी’ या मराठी चित्रपटात ती एका मध्यमवर्गीय तरुणीची भूमिका साकारणार आहे. अनिल सहाने प्रोडक्शनच्या या मराठी चित्रपटाचा नायक नागपूर येथील एक गुणवंत कलावंत कचर्या नामक व्यक्तिरेखा साकारतो आहे. हा चित्रपट विनोदी असून शिक्षाप्रधान असल्याचे सोनूने सांगितले. चित्रपटात ४ मराठी गीते असून गोंधळ, कोळी, नृत्याने रसिकांना खिळवून ठेवण्यास मदत होणार आहे. यावेळी चित्रपटातील सुबोध सुरजीकर, अभिनेते निखील इंगळे, अमित सावरकर, खुशी सिंग, अविनाश लागोंटे उपस्थित होते.